नागपुरात अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून साकारली स्मार्ट नर्सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:21 AM2020-08-14T00:21:12+5:302020-08-14T00:30:57+5:30
अधिकारी कल्पक आणि सौंदर्यदृष्टीचे असले तर उकिरड्यावरच्या वस्तूंमध्येही सौंदर्य शोधले जाऊ शकते. कधी ढुंकूनही न बघितल्या जाणाऱ्या अशा वस्तूंना कलादृष्टीचा स्पर्श झाला तर याच वस्तू सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात. असाच काहिसा प्रकार वन विभागात अलिकडेच साकारण्यात आलेल्या एफडीसीएम कार्यालया लगतच्या नर्सरीमध्ये अनुभवण्यास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिकारी कल्पक आणि सौंदर्यदृष्टीचे असले तर उकिरड्यावरच्या वस्तूंमध्येही सौंदर्य शोधले जाऊ शकते. कधी ढुंकूनही न बघितल्या जाणाऱ्या अशा वस्तूंना कलादृष्टीचा स्पर्श झाला तर याच वस्तू सौंदर्य खुलविणाऱ्या ठरतात. असाच काहिसा प्रकार वन विभागात अलिकडेच साकारण्यात आलेल्या एफडीसीएम कार्यालया लगतच्या नर्सरीमध्ये अनुभवण्यास मिळत आहे. भंगारात निघालेल्या वस्तू वापरून येथील कल्पक अधिकाऱ्यांंनी नर्सरी आकारास आणली. नागरिकांना विरंगुळा देण्यासोबतच आणि विद्यार्र्थ्यांना अभ्यासता येईल अशी रोपटी या नर्सरीमध्ये साकारण्यात आली आहेत.
एफडीसीएम भवन प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या या देखण्या गार्डन आणि नर्सरीचे उद्घाटन वनबल प्रमुख डॉ. रामबाबू यांच्या हस्ते झाले. भारतीय वनसेवा मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) श्री श्री राव नागपूर प्रदेश महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन आणि अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्राणवायू अधिक सोडणारी, हवा शुद्ध करणारी तसेच औषध वनस्पतींनी युक्त असलेली ही नर्सरी आता नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. ७० पेक्षा अधिक प्रजातींच्या रोपट्यांचा यात अंतर्भाव असून अभ्यासकांना आणि नागरिकांना रोपट्यांचे औषधी गुणधर्म कळावे यासाठी लगतच फलक लावले आहेत.
०.२५ हेक्टर क्षेत्रामध्ये ही नर्सरी साकारण्यात आली आहे. बाग आणि नर्सरी असा दुहेरी उद्देश ठेवून ही उभारणी झाली आहे. ही जागा पूर्वी विनावापराची होती. वर्षभरापूर्वी कामाला सुरुवात झाली. नासाकडून करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारे हवेतील प्रदूषण कमी करणाºया वनस्पतींचे रोपण येथे करण्यात आले. निरुपयोगी टायर, कुलरच्या टाक्या, टेबलचे ड्रॉवर, काचेच्या बाटल्या अशा वस्तू वापरून रोपटी लावण्यात आली. टायरपासून आणि काचेच्या बाटल्यांपासून सोफा करण्यात आला. भंगारात पडलेल्या एका चारचाकी वाहनाला कल्पकतेने सजवून त्यावर रोपटी ठेवण्यात आली. भंगारात निघालेल्या एका ट्रकचे केबिनही येथे असेच उत्तम सजविण्यात आले आहे. भेगाळलेल्या भिंतीची डागडुजी करून वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना चिंचखेडे यांनी स्वत: वारली पेटिंग करून ही भिंत सजीव केली. टाईल्सचे तुकडे वापरून रस्ता तयार करण्यात आला. दगडांचे विविध प्रकारे रेखाटन करून झालेले सुशोभीकरण येथील सौंदर्यात अधिकच भर घालते. इम्तिएन्ला आओ यांच्या नेतृत्वाखाली गार्डन सुपरवायझर तिआनारो पोंजेन, वनपरिक्षेत्र अधिकारी तृप्ती ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना चिंचखेडे, वनपाल एस. डी. पाटील यांनी जीव ओतून सजविलेली ही नर्सरी आता देखणी झाली आहे.
निरोपाची सुखद आठवण
एपीसीसीएफ तसेच मुख्य महाव्यवस्थापक (औषध व शास्त्र) इम्तिएन्ला आओ यांच्या संकल्पनेतून ही नर्सरी साकार झाली आहे. वर्षभरापूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. ही नर्सरी पूर्ण झाली, मात्र त्यांची मुंबईला बदली झाली. परंतु त्यांच्या निरोपाच्या आदल्या दिवशीच त्यांच्याच उपस्थितीत लोकार्पण करून निरोपाची सुखद आठवण त्यांच्यासोबत देण्यात आली.