नागपूर : मध्यप्रदेशातून भाजीपाल्याच्या आड सुगंधित तंबाखू आणून साळ्याला देणे एका भाजीव्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. पाच आरोपींनी तोतया पोलीस कर्मचारी बनत ‘तोडपाणी’च्या नावाखाली भाजीव्यापारी व त्याच्या साळ्याला लुटले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींना एका पोलीस कर्मचाऱ्यानेच टीप दिली होती व त्यालादेखील अटक करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हेमराज मोरबाजी नंदनवार (४४, तांडापेठ, लाडपुरा) हे मध्यप्रदेशातील पांढुर्णाजवळील गावांतून भाजी खरेदी करतात व ट्रकने नागपुरात आणून कळमना बाजारात विक्री करतात. मध्यप्रदेशात सुगंधित तंबाखूच्या विक्रीला मनाई नसल्याने ते तेथून तंबाखू खरेदी करतात व साळा तेजस सुरेश बाजीराव (बाजीराव गल्ली) याला आणून देतात. ते भाजीपाल्यात तंबाखू लपवून आणतात. २० फेब्रुवारी रोजी ९० हजारांचा सुगंधित तंबाखू विकत घेऊन ते बाजीराव गल्लीत पोहोचले. त्यावेळी तेथे चार जण आले व पोलीस असल्याची त्यांनी बतावणी केली. गाडीची तपासणी करण्याचे नाटक करत त्यांनी गुटखा शोधला. तस्करीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवत त्यांनी हेमराज यांच्यासोबत ‘तोडपाणी’ केली व साडेतीन लाखांत सौदा ठरला. तेजसजवळ ४.३० लाख रुपये असलेली थैली होती. ती एकाने हिसकावली. त्यानंतर कारवाईचा धाक दाखवत मोटारसायकलवर आरोपींनी तीन पोते तंबाखू ठेवला व ते निघून गेले.
हेमराज यांना संशय आला व त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपींचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेज इत्यादींच्या माध्यमातून संदीप भीमराव सुरडकर (४०, राऊतनगर, दिघोरी), रितेश महादेव मस्के (३५, इतवारी, मस्कासाथ), मंगेश तात्याराव सावरकर ( ४२, इतवारी,मिरची बाजार), अभिलाश संतोष नामदेव ( ३०, लाभलक्ष्मीनगर) यांना अटक केली. या आरोपींना ग्रामीण पोलीस मुख्यालयातील अंमलदार सचिन दिलीप मेश्राम (३५, टेकानाका) याने टीप दिली होती. त्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या टोळीने याअगोदरदेखील असे प्रकार केले आहेत का याचा तपास सुरू आहे.