लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्पदंंश होणे ही दुर्घटना आहे. मात्र, हा अपघात की नैसर्गिक घटना, यावर अद्यापही दुमत आहे. यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात एकवाक्यता नसल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेचाला सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या केस पेपरवर बरेचदा एमएलसी (मेडिकल लीगल केस) असा उल्लेख नसल्याने अडचण उद्भवत आहे.
सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णाला उपचारासाठी दाखल करताना केस पेपरवर एमएलसी उल्लेख अपेक्षित असतो. मात्र, अपघात की नैसर्गिक घटना अशा द्विधा मानसिकतेमधील डॉक्टरांकडून अशी नोंद होत नाही. रुग्णांचे नातेवाईक जागरूक असले तर डॉक्टरांशी चर्चा करून तसा उल्लेख करून घेतात. मात्र, बहुतेक घटना खेड्यातील व्यक्तींसोबत घडत असल्याने त्यांना यासंदर्भात ज्ञान नसते, तातडीने उपचार महत्त्वाचा असल्याने विचारणा करण्याची मानसिकता नसते. अशा वेळी रुग्णांचे केस पेपर एमएलसी उल्लेखाविनाच राहतात.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा केली असता, रुग्णाने सांगितलेल्या माहितीवरून डॉक्टरांनी प्रकरण समजून घ्यावे व त्यानंतर केस पेपर एमएलसी नोंद घेण्याबाबत ठरवावे, असा प्रघात असल्याचे सांगितले. मात्र, यासंदर्भात स्पष्टता नसल्याने अनेक प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा गोंधळ उडत असल्याचे दिसते.
एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या घटनेमध्ये रुग्णाच्या शरीरात विष भिनल्यावर किडनी, तसेच अन्य अवयव निकामी होतात. प्रसंगी मृत्यूही ओढावतो. मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे आवश्यक असल्यामुळे दाखल करतानाच एमएलसी नोंद केलेली योग्य ठरते. जिल्हास्तरावरील अनेक शासकीय रुग्णालयांमधून सर्पदंशाच्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी रेफर करायचे असल्याने केस पेपरवर एमएलसीची नोंद आवश्यक ठरते.
नागपुरातील मेयोमध्ये वर्षाला ९० वर रुग्ण येथील मेयोमध्ये सर्पदंशाचे वर्षाला ९० वर रुग्ण येतात. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात विषबाधेवरील उपचाराची अद्ययावत सुविधा आहे. तिथे दाखल होणाऱ्या विषबाधेच्या रुग्णांचा आकडा अधिक असतो. वर्धामधील मेघे हाॅस्पिटलमध्येही वर्षाला ४५ च्या वर सर्पदंशाचे रुग्ण असतात. गडचिरोली, चंद्रपुरातही ही संख्या अधिक आहे. अनेकदा रुग्णाला रेफर करताना एमएलसी नोंद नसल्यास तांत्रिक अडचण येते.
असा आहे तांत्रिक पेच
अचानक सापावर पाय पडल्याने तो डिवचला गेल्यास दंश करतो. अपघात जाणीवपूर्वक होत नाही, तसाच सर्पदंशही जाणीवपूर्वक करून घेतला जात नाही. तो सुद्धा अपघातच असतो. एखाद्याचा काटा काढण्याच्या हेतूने मुद्दाम सर्पदंश केला जात असल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात तपासानंतर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कायदेशीर अधिकार आहेत.
विषारी सर्पदंशावर उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळे एमएलसी होणे आवश्यकच आहे. तो अपघातच मानला जावा. तांत्रिक अडचण येत असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना कॉल द्यावा.
श्रीकांत उके, सर्पमित्र, नागपूर