... तर, महापौर जोशी कुटुंबीयांसह ठार झाले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:05 PM2019-12-18T23:05:44+5:302019-12-18T23:07:16+5:30
महापौर संदीप जोशी यांच्यावर करण्यात आलेला गोळीबार हा एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे एकूणच घटनाक्रमावरून आता स्पष्ट होऊ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौरसंदीप जोशी यांच्यावर करण्यात आलेला गोळीबार हा एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचे एकूणच घटनाक्रमावरून आता स्पष्ट होऊ लागले आहे. महापौर जोशी यांच्या वाहनात त्यांचे कुटुंबीय असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता, ही गोष्ट या वाहनावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांवरून लक्षात येते.
जामठा येथील रसरंजन धाबा येथून जेवण करून घरी परत येत असताना त्यांच्या वाहनात ते आणि त्यांचे मित्र आदित्य ठाकूर होते. जोशी स्वत: वाहन चालवीत होते. एरवी संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत असते. हल्लेखोरांनी या वाहनावर एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी वाहनाच्या बाहेरील भागाला स्पर्शून गेली. इतर तीन गोळ्यांपैकी एक गोळी वाहनाच्या मागील भागातील काचेवर, दुसरी मध्यभागी डाव्या बाजूच्या काचेवर तर तिसरी गोळी चालकाच्या बाजूला असलेल्या काचेवर झाडण्यात आली. या तिन्ही गोळ्या काचेतून आत येऊन धडकल्या. वाहनात जर पाच ते सहा सदस्य असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.
मंगळवारी १७ डिसेंबरला महापौर जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे ते आणि त्यांचे कौटुंबिक मित्र मंगळवारी रात्री वेगवेगळ्या सात वाहनांमधून जेवण करण्यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ असलेल्या रसरंजन धाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करून ते तेथून ११.५० ला घराकडे निघाले. जोशी आणि त्यांचे मित्र आदित्य ठाकूर फॉर्च्युनर वाहनात (एमएच ३१/एफए २७००) बसून होते तर, त्यांची पत्नी देवयानी तसेच मुलगी मानसी सोबतच्या मंडळींच्या वाहनांमध्ये बसल्या होत्या. जोशी यांचे वाहन सर्वात मागे होते. त्याच्या पुढच्या वाहनात साधारणत: २०० फुटांचे अंतर होते. वर्धा मार्गावरील राणीकोठीच्या एक फर्लांगअगोदर जोशी यांचे वाहन आले अन् त्यांच्या वाहनाच्या मागच्या काचेत एक गोळी शिरली. काही वेळेतच दुसरी गोळी उजव्या बाजूच्या दुसऱ्या दाराच्या काचेच्या खिडकीत छिद्र करून गेली.
यावेळी आपल्यावर गोळीबार होत असल्याचे जोशी आणि ठाकूर यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत जोशी यांनी मान खाली वाकवत हॅन्डब्रेक लावून वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. तेवढ्यात तिसरी गोळी स्टेअरिंग व्हीलच्या जवळील कोपऱ्याला छिद्र करून आत पडली. अचानक वाहन थांबले अन् जोशी यांनी खाली मान वाकवल्यामुळे दुचाकीवर असलेल्या हल्लेखोरांना जोशींना गोळी लागली असावी, असे वाटले. त्यामुळे त्यांनी लगेच दुचाकी मागे वळवून मागच्या बाजूने पळ काढला. जातानाही त्यांनी एक चौथी गोळी झाडली. जोशी यांनी लगेच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना फोन करून या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे पोहचले. तेथून जोशी आणि त्यांची मित्रमंडळी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पहाटे २.२० वाजता बेलतरोडी ठाण्यात पोहचले. त्यांचे सविस्तर बयाण नोंदवून घेण्यात आल्यानंतर पहाटे ४ वाजता या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाळतीवरच होते हल्लेखोर
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवर होते अन् दोघेही हेल्मेट घालून होते. ते महापौर जोशी यांच्या पाळतीवरच होते. ज्या ठिकाणी जोशी यांनी जेवण घेतले, तेथून ते निघाल्याच्या दोनच मिनिटानंतर हल्लेखोर धाब्यावर पोहचले आणि त्यांनी जोशी कधी गेले, अशी विचारणा केली. जोशींसोबत १८ ते २० जण आहेत, हे हल्लेखोरांना माहीत होते अन् ते सात वाहनांपैकी नेमके कोणत्या वाहनात बसले आहेत, त्याचीही त्यांना कल्पना होती. शहरात हल्ला करता येत नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच जोशी यांना शहराबाहेर, रात्रीच्या वेळी ठार मारण्याचे कटकारस्थान आरोपींनी रचले असावे. यावरून हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
...तर दोन ते तीन जणांचा बळी गेला असता
कार्यक्रम किंवा जेवणाच्या निमित्ताने सहकुटुंब बाहेर गेल्यानंतर घरी परत येत असताना स्वाभाविकपणे प्रत्येक जण आपल्या वाहनात आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बसतो. मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर परत येताना जोशी त्यांची पत्नी आणि मुलीसह त्यांच्या वाहनात बसून परत निघाले असते तर मोठा अनर्थ घडला असता. मित्र सोबत असल्यामुळे जोशी हल्ल्याच्या वेळीही हिंमत ठेवून होते. परिवारातील सदस्य सोबत असते तर ते विचलीत झाले असते अन् त्या अवस्थेत हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने गोळ्या झाडल्या त्यातील कोणती गोळी कुणाला लागली असती? केवळ या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. यातील आणखी एक हादरविणारी बाब अशी की, प्रसंगावधान राखत जोशी यांनी मान खाली वाकवत हॅन्डब्रेक लावून वाहन रस्त्याच्या कडेला घेताना केवळ ५ ते १० सेकंदाचा फरक पडला असता तर स्टेअरिंग व्हीलच्या जवळील कोपऱ्याला लागलेली गोळी कदाचित त्यांच्या छातीत किंवा डोक्यात शिरली असती.