...म्हणून संघाने प्रणवदांना आमंत्रित केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:35 PM2018-06-06T22:35:50+5:302018-06-06T22:36:06+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. मुखर्जी हे अनुभवी व परिपक्व नेता असून त्यांच्या येण्यामुळे विचारांचे आदानप्रदान होणार असल्यामुळेच त्यांना बोलविल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुखर्जी यांच्या संघस्थानी येण्याला विरोध करणाऱ्यांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैद्य यांनी ही वैचारिक असहिष्णुता असल्याची टीका केली आहे.
प्रणव मुखर्जी यांचे अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर निश्चित विचार आहेत. संघाने मुखर्जी यांचा अनुभव आणि परिपक्वता ध्यानात घेऊनच त्यांना आपले विचार स्वयंसेवकांसमक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केले आहे. तिथे ते देखील संघाचे विचार ऐकतील, शिक्षार्थ्यांशीदेखील त्यांचे प्रत्यक्ष भेटणे होणार आहे. यामुळे त्यांनाही संघाला थेट समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विचारांचे असे आदानप्रदान ही भारताची प्राचीन परंपराच आहे, असे डॉ.वैद्य यांनी मनोगत मांडले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी संघाचे आमंत्रण स्वीकारल्याने जो वाद सुरू झाला आहे त्यामुळे अनेक तथाकथित उदार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बुरखे घातलेल्या लोकांचा खरा चेहरा उघड होत आहे. या साºया विरोधानंतरही मुखर्जी यांनी कार्यक्रमाला येण्याचे ठरविले. त्यांच्या या दृढतेचे स्वागतच केले पाहिजे, असेदेखील वैद्य यांनी मत मांडले.
मुखर्जी यांच्या भेटीला विरोध का ?
प्रणव मुखर्जी यांच्या संघस्थानावरील भेटीला होत असलेल्या विरोधाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना विचारांच्या आदानप्रदानावर विश्वासच ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. मात्र कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांकडे वैचारिक चिंतकांचा दुष्काळ असल्यामुळे मुखर्जी यांच्या कार्यक्रमाला विरोध करून त्यांनी वैचारिक असहिष्णुता दाखवून दिली आहे. मुखर्जी यांच्यासारख्या परिपक्व व अनुभवी नेत्याना सल्ले देणे आश्चर्यजनकच आहे.