संघ शिक्षा वर्गात ‘सामाजिक समरसता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 10:43 AM2018-06-07T10:43:49+5:302018-06-07T10:43:58+5:30
देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील याचे प्रतिबिंब दिसून येत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. या वर्गात जात-पात, शिक्षण, संपत्ती, वय या सर्वांना बाजूला ठेवून स्वयंसेवक गेल्या २५ दिवसांपासून एकत्रित धडे घेत आहेत. एकाच गणामध्ये कोट्यधीश व्यावसायिक आणि दोन वेळच्या भाकरीसाठी घाम गाळणारा कामगारदेखील समाविष्ट आहे. विशेष म्हणजे यंदा तिशीच्या आतील ५५ टक्के शिक्षार्थी असून अनेकांनी तर या शिक्षा वर्गात सहभागी होण्यासाठी प्रसंगी नोकरीवरदेखील पाणी सोडण्याची तयारी दाखविली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बदलत्या काळाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातदेखील बदल झाले असून तृतीय वर्ष वर्गासाठी ‘सिलेक्शन’ प्रणालीद्वारे स्वयंसेवकांना संधी मिळते. तृतीय वर्गात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांची ठराविक पातळ््यांपासून निवड करण्यात येते.
साधारणत: तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात येते. दरवर्षीनुसार यंदादेखील वयानुसार आणि विषयानुसार स्वयंसेवकांचे गण म्हणजेच गट पाडण्यात आले. म्हणजे ज्यांनी दंडयुद्ध विषय निवडला आहे आणि कॉलेजवयीन आहेत असे एका गणात. योगासन विषय आणि वय यानुसार वेगळा गण. प्रत्येक गणात सर्व प्रदेशांच्या स्वयंसेवकांना सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून त्यांच्यातील सामाजिक समरसता वाढीस लागावी व विचार-संस्कृतीचे आदानप्रदान करता यावे, हा यामागचा उद्देश आहे, अशी माहिती एका संघ पदाधिकाऱ्याने दिली.
संघाचा तरुण चेहरा सहभागी
यंदाच्या शिबिरात देशभरातील ४१ विविध प्रांतांमधून आलेले ७०९ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यांचे वय १८ ते ४० यादरम्यानच आहे. संघ शिक्षा वर्गाचा चेहरादेखील तरुणच असून शिक्षार्थ्यांचे सरासरी वय ३० वर्षे इतके आहे. ३९४ शिक्षार्थ्यांचे वय हे ३० किंवा त्याहून कमी आहे. २० वर्षांहून कमी वय असलेले ११ स्वयंसेवकांचादेखील यात समावेश आहे. तर ३५ ते ४० या वयोगटातील १५७ शिक्षार्थी वर्गात आहेत. वर्गात सहभागी झालेल्यांपैकी ११३ जण हे विद्यार्थी आहेत. ५०१ जण नोकरी व व्यावसायिक आहेत. विशेष म्हणजे या वर्गात ८८ प्रचारक व ७ विस्तारकदेखील समाविष्ट आहेत. ३५० शिक्षार्थी हे हिंदी भाषिक आहेत. तर मराठी भाषिक असलेले ६० स्वयंसेवक वर्गात सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांचादेखील समावेश
तृतीय वर्ग संघ शिक्षा वर्गात ४५ शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. पेरणीअगोदरची कामे असतानादेखील ते वेळ काढून नागपुरात आले असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली. याशिवाय ११७ शिक्षक, १६ अभियंता, १६ वकील, ६ पत्रकार, ६ डॉक्टर हेदेखील या वर्गात सहभागी झाले आहेत.
बहुतांश शिक्षार्थी पदवीधर
तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात देशाच्या सर्व भागातून स्वयंसेवक आले असून ग्रामीण भागातील संख्या जास्त आहे. मात्र असे असले तरी बहुतांश शिक्षार्थी हे पदवीधर आहेत. एकूण शिक्षार्थ्यांपैकी ३७५ जण हे पदवीधर आहेत, तर १९१ जण हे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. तर ६ जण हे ‘पीएचडी’ प्राप्त आहेत.
स्वयंसेवकांनीच केले वर्गाचे नियोजन
वर्ग व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी हीदेखील स्वयंसेवकांवरच देण्यात आली आहे. वर्गात सहभागी न झालेल्या स्वयंसेवकांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. यात शिबिरार्थ्यांचे निवास, भोजन, वैद्यकीय, प्रसिद्धी, नोंदणी, सुरक्षा, विद्युत, वस्तू भांडार, विद्युत व ध्वनी, परिवहन, स्वच्छता, प्रक्षालन, रक्षणव्यवस्था अशा २७ विविध प्रकारच्या व्यवस्थांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात सहभागी न होणाऱ्या स्वयंसेवकांनादेखील नियोजन, नियंत्रण, व्यवस्थापन यांचे एक प्रकारचे प्रशिक्षणच घेण्याची संधी मिळाली.