सोशल मिडिया ते सृजनाचे रचयिता; लेखन, ऑनलाईन संमेलन, चर्चा बरेच काही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:54 PM2020-06-05T18:54:47+5:302020-06-05T18:59:30+5:30
सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता येतो, याची प्रचिती रचयिता साहित्य मंचाने दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता येतो, याची प्रचिती रचयिता साहित्य मंचाने दिली आहे.
मराठी साहित्याची लेखन परंपरा सातत्याने सुरू राहावी या हेतूने रचयिता साहित्य मंचाने गेल्या दिड वषार्पासून जुन्या-नव्या सृजनकांची मोट बांधत व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे. हा ग्रुप म्हणजे महिलांना लेखणीचे माहेरघर व नवोदितांनाह हक्काचे व्यासपीठ झाला आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाचशेहून अधिक लेखक, कवि-कवयित्री जोडले गेले आहेत. या मंचाची स्थापना ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गोपाल फुलउंबरकर व राहुल गावंडे यांनी केली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून चारोळी, काव्य, अभंग, लेख अशा स्पर्धा सुरू झाल्या. हळूहळू समूहात साहित्यिकांची संख्या वाढत गेली आणि नवनव्या कल्पना उतरायला लागल्या. त्यात भारती भाईक, मोहिनी निनावे, अर्चना गुर्वे, कल्पना निंबोकार अंबुलकर यांनी कधी सूत्रसंचालन, कधी निवेदन तर कधी निरुपणकार म्हणून साहित्यिकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. त्याअनुषंगाने ऑनलाईन गणेशोत्सव, नवरात्रोत्सवच्या माध्यमातून सर्वांच्या सुप्त गुणांना चालना दिली जाते. त्याच अनुषंगाने पहिले राज्यस्तरीय काव्यसंमेलन नागपुरात ३ नोव्हेंबर २०१९ ला पार पडले. दोन्ही संस्थेचा वर्धापन दिवसही ऑनलाईनच पार पडला तर दोन ऑनलाईन काव्यसंमेलन घेण्याचा मानही प्राप्त झाला. तसेच काव्यस्पर्धेमध्ये २४६ कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला होता. अशा तऱ्हेने दररोज वेगवेगळ्या विषयांवर शंभरहून जास्त कविता या समूहातील सभासद लिहित असतात आणि सादर करत असतात. व्हॉट्सअपवर होणारा हा उपक्रम म्हणजे एकमेवाद्वितीय असाच आहे. यात स्मिता किडिले, माधुरी करवाडे, सुवर्णा गावंडे, साधना फुलउंबरकर यांचाही सहभाग असतो.