फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:48 PM2019-02-09T22:48:09+5:302019-02-09T22:50:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५० टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या मूकबधिर वडिलांवरील उपचाराचा ...

Society came to the aid of Phulchand | फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज

फुलचंदच्या मदतीला धावून आला समाज

Next
ठळक मुद्देविविध संघटना, शेकडो लोकांनी दिला माणुसकीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५० टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या मूकबधिर वडिलांवरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंदवर कचऱ्यातील प्लास्टिक वेचण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने तो चिमुकला व त्याचे कुटुंबीय सोसत असलेली वेदना पुढे आणताच अवघे समाजमन गहिवरले. असंवेदनशीलतेचा आरोप झेलणाऱ्या याच समाजातून शेकडो मदतीचे हात पुढे सरसावले आणि उदारतेचे दर्शन घडले.
२४ जानेवारीच्या त्या आगीच्या घटनेमुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मेडिकलच्या परिसरात कचऱ्यातील प्लास्टिक वेचण्याची वेळ चौथ्या वर्गात शिकत असलेल्या फुलचंदवर आली. शासकीय रुग्णालये असताना बाहेरून औषधे आणावी लागत होती. वडिलांचा हाताला असलेली जखम यामुळे उपचाराचा खर्च भागविण्याची जबाबदारी चिमुकल्या फुलचंदवर आली. आई-वडील आणि एक वर्षाच्या भावाची सेवा करीत भल्या पहाटे उठून फुलचंद कचºयातून प्लास्टिक वेचून कसातरी उपचाराचा खर्च भागवित होता. याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘आईच्या उपचारासाठी १० वर्षीय फुलचंद वेचतो कचरा’ या मथळ्याखाली ८ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. सोबतच मदतीचे आवाहनही केले. या आवाहनाला समाजमन धावून आले. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, पत्रकार, भाजी विक्रेते, किरणा दुकानदार, अ‍ॅम्बुलन्सचालक सर्वच मदतीसाठी सरसावले. कोणी आर्थिक मदत केली, कोणी औषधे आणून दिली, कोणी जेवणाचा डबा, कोणी कपडे आणून दिले, तर काहींनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. काही जण घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, हे मायेचे बळ देण्यासाठी मेडिकलमध्ये आले. प्रत्येकाची एकच तयारी होती ती म्हणजे त्या कुटुंबाला ‘माणुसकी’चा हात देण्याची.
दत्ता मेघे यांनी उचलला शिक्षणाचा खर्च
माजी खासदार दत्ता मेघे यांनी वृत्त वाचून फुलचंदची तातडीने भेट घेतली. घडलेली घटना जाणून घेतली. फुलचंदला आर्थिक मदत करीत त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. याशिवाय कुठली मदत लागल्यास नि:संकोच घरी ये, असे आश्वस्त केले.
दीनदयाल थाळी, समर्पण फाऊंडेशनने सोडविला जेवणाचा प्रश्न
फुलचंदसमोर वडील, एक वर्षाचा लहान भाऊ यांच्या जेवणाचा प्रश्न होता. रुग्णालयाकडून आईला मिळणाऱ्या जेवणामधून कसेतरी ते पोट भरीत होते. परंतु वृत्तामुळे त्याचा जेवणाचा प्रश्नही सुटला. मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी यांनी फुलचंद आणि त्याच्या कुटुंबासाठी पं. दीनदयाल थाळी नि:शुल्क उपलब्ध केली, सोबतच उपचारासाठी मदतही केली. समर्पण फाऊंडेशननेही त्याच्या जेवणाचा भार उचलला.
या संघटना, व्यक्तींनी केली भरभरून मदत
‘एक पाऊल माणुसकी’ या संस्थेचे अमृता अदावडे, प्राची सहारे, साहिल सहारे, शुभम घोडे, प्रीत मेश्राम, निकेश पिने, मिनू रावत यांनी फुलचंदला मोबाईल फोन विकत घेण्यापासून त्याला मिळालेली आर्थिक मदत त्याच्या बँकेत जमा करण्यापर्यंतची मदत केली. याशिवाय, भारतीय जनता पार्टीचे दक्षिण-पश्चिमचे उपाध्यक्ष संजय जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नागपूर शहरचे अध्यक्ष बाळू घरडे, निदान वेलफेअर फाऊंडेशन, राजीवकुमार सूर्यवंशी, उत्तम सेनापती, बी.व्ही. कनेरे, किशोर भोंगाडे, सुनील सारीपुत्त, प्रकाश दर्शनिक, सुधीर अ‍ॅम्बुलन्स, अश्विन मोरे, गरज बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था, आर्थिक आझादी अभियान, श्री गुरुदेव हळद पावडर, वनमाला सोनटक्के, प्रभाकर सोनटक्के, मोनिका धाडसे आणि त्यांचा ग्रुप, किशोर भोंगाडे, दादा मामीडवार, शालिनी, वंजारी, तुषार, शुक्ला, नागपूर सिटी पोलीसचे सुरेश मिश्रा, राकेश तिवारी, किशोर ठाकरे, भागवती ठाकरे, राजेश वर्टी यांच्यासह अनेकांनी मदत केली.

 

Web Title: Society came to the aid of Phulchand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर