लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या अनुषंगाने विदर्भातील तीर्थस्थानांची माती व जल अयोध्येसाठी रवाना करण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे भारतातील पवित्र नद्यांचे जल आणि तीर्थक्षेत्रांची माती मंदिराच्या पायाभरणीसाठी मागविण्यात आले होते.विदर्भातील अंभोरा संगम येथील जल, वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील जल आणि माती, रामटेक येथील माती तसेच मोहिते वाड्यातील माती अयोध्येला पाठवण्यात आली. रामटेक येथील गडमंदिराचे पुजारी धनंजय पंडे, राम पंडे, अविनाश पंडे, मुकुंद पंडे यांनी मातीची विधिवत पूजा, अभिषेक केला. त्यानंतर ती रामटेक नगर संघचालक किशोर नवरे, विहिंपचे जिल्हा उपाध्यक्ष कंगाले, जिल्हा सहमंत्री मंगलप्रसाद घुगे यांना सुपूर्द करण्यात आली. मोहिते वाड्याची माती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे यांच्या हस्ते विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी विहिंपचे नागपूर महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, रा.स्व.संघाचे महानगर कार्यवाह अरविंद कुकडे, विहिंपचे प्रांत सहकोषाध्यक्ष हरीश हरकरे, प्रांत प्रचार-प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार, नागपूर महानगर मंत्री प्रशांत तितरे, बजरंग दल महानगर सहसंयोजक विशाल पुंज प्रामुख्याने उपस्थित होते.
राममंदिरासाठी विदर्भातील तीर्थस्थानांची माती, जल रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:49 PM