नागपूरच्या तरुणींना मध्य प्रदेशात विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:22 AM2020-10-05T11:22:24+5:302020-10-05T11:22:54+5:30

Human trafficking, Nagpur News दोन तरुणींना रोजगाराचे आमिष दाखवून एका टोळीने त्यांची मध्य प्रदेशमध्ये नेऊन विक्री केली. या दोघींच्या बदल्यात एक लाख ९० हजार रुपये घेऊन आरोपी नागपुरात परतले.

Sold to young women from Nagpur in Madhya Pradesh | नागपूरच्या तरुणींना मध्य प्रदेशात विकले

नागपूरच्या तरुणींना मध्य प्रदेशात विकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींना रोजगाराचे आमिष दाखवून एका टोळीने त्यांची मध्य प्रदेशमध्ये नेऊन विक्री केली. या दोघींच्या बदल्यात एक लाख ९० हजार रुपये घेऊन आरोपी नागपुरात परतले. तर विकत घेणाऱ्या आरोपींनी त्या तरुणींवर अनन्वित अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी या टोळीतील एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

अनुसूचित जमातीच्या या दोन तरुणी नातेवाईक आहेत. त्या रोजगाराच्या शोधात असताना माया नामक महिलेची त्या दोघींसोबत जूनमध्ये ओळख झाली. तिने त्यांना घरोघरी जाऊन साहित्य विकण्याचा रोजगार दिला. त्यानंतर पारडीतील आकाश नामक आरोपीच्या संपर्कात या मुली आल्या. त्याने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तसेच मध्य प्रदेशात या दोन ठिकाणी मोठा आॅर्डर असून तेथे जाऊन आपल्याला माल विकायचा आहे. खाणे-पिणे, राहणे आणि दहा हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले. दोघींच्याही घरची स्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्या दोघी मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी तयार झाल्या.

आरोपी आकाश आणि त्याचा साथीदार सुशील पैसाडील या दोघांनी जून-जुलैमध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यात नेले. तेथे यादव नामक आरोपींना या दोघींची एक लाख ९० हजार रुपयात विक्री केली. आरोपीने एका मंदिरात या दोघींसोबत जबरदस्तीने लग्न लावले आणि त्यांच्यावर ते अत्याचार करू लागले. असह्य झाल्यामुळे मुली विरोध करू लागल्या. त्या दाद देत नसल्याचे पाहून आरोपींनी आकाशला बोलावून घेतले. त्यानुसार चार दिवसांपूर्वी आरोपी आकाश त्याच्या पत्नी मुलासह टिकमगडला गेला. या दोघी आमच्याजवळ राहायला तयार नसल्यामुळे आमचे पैसे परत कर, असे आरोपी आकाशला म्हणाले. एवढेच नव्हे तर आकाशला आपल्या ताब्यात ठेवून आरोपींनी त्याच्या पत्नी, मुलांना नागपुरात पैसे आणण्यासाठी पाठवले.

गावात बोभाटा
गावात बोभाटा झाल्याने हे प्रकरण त्या गावातील पोलिस ठाण्यात पोहोचले. आकाशने पीडित तरुणीच्या पालकांना व्हिडिओ कॉल करून ही माहिती सांगितली. टिकमगड पोलिसांनीही स्थानिक वरिष्ठांशी संपर्क करून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्यानुसार मुलींच्या आई तसेच गिट्टीखदानचे पोलीस पथक शनिवारी तिथे पोहोचले. त्यांनी मुलींना आणि आरोपी आकाशला ताब्यात घेतले. त्यांना नागपुरात आणण्यात आले. मुलींच्या तक्रारीवरून आरोपी आकाश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण करून विक्री करणे, बलात्कार करणे आदी आरोपांखाली अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

नरकयातनांमुळे तरुणी शहारल्या
अनेक दिवस आरोपींच्या ताब्यात नरकयातना भोगणाऱ्या त्या दोन तरुणी  नागपुरात परतल्या. मात्र त्या पुरत्या मानसिकरीत्या खचल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन केले आहे.

 

Web Title: Sold to young women from Nagpur in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.