नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला २४ तास उलटूनही कुणालाच गंभीर स्वरूपाचे ‘रिअॅक्शन’ आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १६६, तर संपूर्ण विदर्भात २०१ लाभार्थ्यांना किरकोळ रिअॅक्शन दिसून आल्याची नोंद झाली. यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लस दिलेल्या जागी दुखणे किंवा खाज सुटण्याची लक्षणे आहेत. विशेष म्हणजे, यातील सहा लाभार्थ्यांना जास्त ताप आल्याने रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तज्ज्ञाच्या मते हे किरकोळ रिअॅक्शन असून घाबरण्याचे कारण नाही.
कोरोनाचा प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता त्याचा शुभारंभ शनिवारी झाला. विदर्भातील ११ जिल्ह्यात ५४ केंद्रावर ५५८५ पैकी ३९१६ लाभार्थ्यांना (७०.११ टक्के) लस देण्यात आली. नागपूर जिल्ह्यात ६५.४८ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. जिल्ह्यातील १२ केंद्राना ११८५ लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील ७७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात शहरातील २७०, तर ग्रामीणमधील ५०६ लाभार्थ्यांचा समावेश होता. लसीकरणानंतर लाभार्थ्यांना कोणतेही लक्षणे दिसल्यास त्यांनी तातडीने याची माहिती आरोग्य विभागाला देण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांत १६६, तर विदर्भात २०१ लाभार्थ्यांना किरकोळ रिअॅक्शन आल्याची नोंद झाली आहे.
-नागपुरातील एक, तर अमरावती विभागात पाच लाभार्थी भरती
लसीकरणानंतर खूप जास्त ताप आलेल्या सहामध्ये नागपुरातील एक लाभार्थी असून, त्यांना शालिनी ताई मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले. उर्वरित पाच लाभार्थी अमरावती विभागातील असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- घाबरण्याचे कारण नाही
कोणत्याही लसीकरणानंतर सौम्य, मध्यम व गंभीर रिअॅक्शन दिसून येतात. आपल्याकडे लसीकरणानंतर दिसून आलेली लक्षणे ही सौम्य व मध्यम स्वरूपातील आहेत. सौम्य लक्षणामध्ये हलका ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे, लस दिलेल्या जागी दुखणे किंवा खाज सुटणे आदी लक्षणे दिसून आली आहेत. लक्षणे दिसणे म्हणजे लस काम करीत असल्याचे स्पष्ट होते. लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. नितीन शिंदे
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ