दरवर्षी २००-२५० तक्रारी : अनेक संसार उध्वस्त, अनेकांचे गेले बळी
नागपूर : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधक्षद्धेचे भूत उतरायला तयार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भानामतीच्या प्रकरणाने समाजातील हे चित्र स्पष्ट केले आहे. ग्रामीणच नाही तर शहरातही आणि निरीक्षरच नाही तर सुशिक्षित लाेकांमध्येही मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेच्या भानामतीने अनेक संसार उध्वस्त केले, अनेकांचे बळी घेतले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माहितीनुसार वर्षाला २०० ते २५० जादूटाेन्याच्या कारणाने छळ केला जात असल्याच्या तक्रारी समितीकडे प्राप्त हाेतात.
२०१३मध्ये झाला कायदा
‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ हा महाराष्ट्राततील गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा २००३ मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनिस)चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी तयार केलेला आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर २६ ऑगस्ट २०१३ रोजी हे विधेयक मांडण्यात आले आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर २०१३ मध्ये ते मंजूर करण्यात आले. लाेकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन जादूटाेन्याच्या नावावर लाेकांची फसवणूक करणे, शाेषण करणे, अत्याचार करणाऱ्यांच्या विराेधात कठाेर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. हा दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून अशा आराेपींविराेधात गुन्ह्याच्या स्वरूपावरून ६ महिने ते ७ वर्षाची शिक्षा तसेच ५० हजारापर्यंत दंड ठाेठावला जाताे.
आठ वर्षात १७६ वर गुन्हे
अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात जादूटाेन्याच्या प्रकरणाच्या २०० ते २५० तक्रारी प्राप्त हाेतात. मात्र यातील काहीच प्रकरणात गुन्हे दाखल केले जातात. गेल्या आठ वर्षात १७६ च्या आसपास गुन्हे दाखल झाले आहेत. यातील बहुतेक प्रकरणे गंभीर स्वरूपाची हाेती, ज्यामध्ये पीडितावर अत्याचार किंवा बळी जाण्याच्या घटना घडल्या.
भानामती नाही, हे विज्ञानाचे खेळ
जादूटाेन्याच्या बहुतेक घटनांमध्ये वैज्ञानिक गाेष्टींचा आधार घेऊन सामान्य लाेकांना मुर्ख बनविले जाते. माैदा तालुक्यातील सिंगाेरी या गावी एका सधन व्यक्तिच्या आईच्या अंगात देवी आली आणि गावाबाहेरील दलित कुटुंबातील लाेक जादूटाेना करीत असल्याने सुनेचा आजार बळावल्याचा आराेप केला. ही अंधश्रद्धा मनात ठेवून त्या व्यक्तिने दाेघांचा खुन केला तर इतर दाेघांना गंभीर जखमी केले. २०१८ मध्ये मांगली गावामध्ये असाच प्रकार घडला. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून जादूटाेना करीत असल्याचा आराेप करीत हल्ला करण्यात आला व बापलेकाला बेदम मारहान करण्यात आली. तेव्हापासून वडील गावात गेले नाही व मुलावर यावर्षी जुलै महिन्यात पुन्हा हल्ला करण्यात आला. नागपूर तालुक्यातील पाचगावचे खटुली बाबाचे प्रकरण असेच गाजले.
म्हणे, पैशांचा पाऊस पाडतो..
कायदा आणि अंनिसचे प्रबाेधन कार्यामुळे अशा घटनांवर बऱ्यापैकी अंकुश लागला आहे पण खुप पल्ला गाठायचा आहे. एखादी घटना घडते, नंतर यंत्रणांना जाग येते आणि पुन्हा गप्प बसले जाते. यामध्ये पाेलिसांकडूनही कसूर हाेताे. कायद्याची माहिती नसल्याने पाेलीस अशा प्रकरणांना गांभीर्याने घेत नाही व माेठा गुन्हा घडल्यावरच धावपळ केली जाते. त्यांचे कठाेर प्रशिक्षण गरजेचे आहे. याशिवाय गावपातळीवर कायद्याविषयी प्रबाेधन करण्याची नितांत गरज आहे.
- हरीश देशमुख, महासचिव, अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती