सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस

By admin | Published: May 25, 2017 01:43 AM2017-05-25T01:43:45+5:302017-05-25T01:43:45+5:30

सोनेगाव तलावाला ऐतिहासिक वारसा आहे. १८०३ साली सैय्याजी भोसले यांनी सैन्य व जनावरांसाठी या तलावाची निर्मिती केली होती.

Sonegaon lake is the day of gold | सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस

सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस

Next

चेतन गजभिये : गतवैभव प्राप्त होणार े सीप्लेन उतरणार े वर्षभर मुबलक पाणी राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोनेगाव तलावाला ऐतिहासिक वारसा आहे. १८०३ साली सैय्याजी भोसले यांनी सैन्य व जनावरांसाठी या तलावाची निर्मिती केली होती. ४० हेक्टर क्षेत्रात हा तलाव होता. तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने गाळ व माती साचली आहे. तलावाला जमिनीचे स्वरूप आले आहे. तलावाला गतवैभव प्राप्त करण्याचा संकल्प केला आहे. तलावात वर्षभर पाणी राहील; सोबतच एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल. येथून सीप्लेनने उड्डाण भरावे, पुढील तीन-चार वर्षांत सोनेगाव तलावाला सोन्याचे दिवस येतील, असे स्वप्न आहे. लोकप्रतिनिधी व जनसहभागातून हे स्वप्न साकार होईल, असा ठाम विश्वास चेतन बंधाऱ्याचे जनक व भूजल सर्वेक्षण विभागाचे माजी सहसंचालक चेतन गजभिये यांनी व्यक्त केला.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाच्या दक्षिण-पश्चिम नागपूरतर्फे सोनेगाव तलावाची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. अभियान ३१ मेपर्यंतच मर्यादित न राहता चेतन गजभिये यांच्या मार्गदर्शनात पुढील तीन ते चार वर्षे राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून नेमकी कोणती कामे प्रस्तावित आहेत, यासंदर्भात लोकमतशी चर्चा करताना गजभिये बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपराजधानीला टॉप टेन सिटीत स्थान मिळावे, यासाठी संकल्प केला आहे. गतकाळात गडकरी पालकमंत्री असताना पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे टँकरमुक्त केले होते. समाजाशी बांधिलकी म्हणून कोणताही मोबदला न घेता मी या अभियानात सहभागी झालो आहे.
तलाव ४० हेक्टर क्षेत्रात होता; परंतु अतिक्रमणामुळे तलावाचे क्षेत्र २२ हेक्टरवर आले आले. यामुळे तलावाचा येवा बंद झाला आहे. तो पुनरुज्जीवित करण्यात येईल. विमानतळाच्या बाजूच्या नाल्यात चार मोठे पाईप लावण्यात आले आहेत. पोहरा नाला व त्याला जोडणाऱ्या नाल्याचा येवा, लंडन स्ट्रीट परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचा येवा सोनेगाव तलावाकडे वळविला जाणार आहे, सोबतच तलावातील सुप्त जलस्रोत पुनरुज्जीवित क रण्यात येतील.
लीकेज दुरुस्ती, संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. यासाठी जिओलॉजिकल सर्वे, हायड्रो जिओलॉजी सर्वे, जिओ फिजिकल सर्वे, अर्थक्यूचे नकाशे, लॅन्ड सायडिंग इमेज, भूशास्त्रीय अभ्यास करून ३० ते ४० रिचार्ज शॉप करण्यात येणार असल्याची माहिती गजभिये यांनी दिली.
तलावातील माती व गाळ सुपीक आहे. शेती व बगिचासाठी हा गाळ उपयुक्त ठरणार आहे. याचा शेतकरी व नागरिकांना लाभ घेता येईल. सोनेगाव तलावाला प्राचीन वैभव प्राप्त करण्याचे काम एकट्याचे नाही. यासाठी जनसहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. हा तलाव माझा आहे, या भावनेतून नागरिकांनी या अभियानात सहभाग घेण्याची गरज आहे.
तलावातील गाळ काढतानाच यंत्राच्या साह्याने भूगर्भातील ४०० फूट खोलपर्यंत पाण्याचा शोध घेतला जात आहे. तसेच तलावातील लुप्त झऱ्यांचा शोध घेतला जात आहे. झरे पुन्हा रिचार्ज करण्यात येणार आहे. तलावाचे पाणी शुद्ध राहील याची काळजी घेतली जाणार आहे. भविष्यात या तलावात वर्षभर पाणी उपलब्ध राहणार आहे. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही, यासाठी उपायोजना करण्यात येतील.

वारली पेंटिंगने खुलणार तलाव परिसराचे सौंदर्य
स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘आय क्लीन नागपूर’ संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या सदस्यांनी सोनेगाव तलाव परिसरातील भिंतीवर ४० वारली पेंटिंग काढल्या असून याद्वारे जनजागृती केली जात आहे. यामुळे सोनेगाव तलाव परिसराचे सौंदर्यही खुलणार आहे. पर्यावरण संरक्षणाचे संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. मंगळवार व बुधवारी या दोन दिवसात १८ भिंतींवर वारली पेंटिंगद्वारे पाणी वाचवा, वृक्षारोपण करा आदी संदेश देणारी चित्रे काढण्यात आलेली आहेत. या उपक्रमात संस्थेच्या संस्थापिका वंदना मुजुमदार, शेखर भोळे, कल्पना भोळे, अजिंक्य टोपरे, जयदीप मोघे आदी सहभागी झाले आहेत.

लोकप्रतिनिधींचा पुढाकार कौतुकास्पद
सोनेगाव तलावासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच कोटी तर महापौर नंदा जिचकार यांनी दोन कोटींचा निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली आहे. महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद असल्याचे चेतन गजभिये यांनी सांगितले.

रेन वॉटर हार्वेस्टिंग
पावसाचे छतावरील पाणी जमिनीत मुरले पाहिजे. यासाठी भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण झाले पाहिजे. परिसरातील विंधन विहिरी पुन्हा रिचार्ज करण्यात येतील. यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्याची गरज आहे. यावर शासनाने अनुदान जाहीर केले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गजभिये यांनी केले.

Web Title: Sonegaon lake is the day of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.