तहसील कार्यालयाजवळ वीरूगिरी : वृद्धाश्रमासाठी अनुदान देण्याची मागणी नागपूर : आपल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिलेने तहसील कार्यालयाजवळच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली. विधानभवनापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी ‘भाईगिरी’चे प्रदर्शन करून पत्रकारांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे घटनास्थळ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.अनुदानाची प्रतीक्षा कायम नागपूर : सोनू येवले (वय ४५) असे आंदोलक महिलेचे नाव आहे. त्या वृद्धाश्रमाची संचालिका आहे. वृद्धाश्रमाला शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून येवले यांनी सरकारकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत. तीन चार वर्षांपासून त्या दर वर्षी विधीमंडळाच्या अधिवेशनात येतात आणि आपल्या मागणीच्या संबंधाने शासनाकडे पाठपुरावाही करतात. मात्र, सरकारकडून लक्ष दिले जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या सोनू येवले यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरातील टॉवर गाठले. पन्नासेक फूट वर चढून येवले घोषणा देऊ लागल्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलिसांनी टॉवरवर चढण्याचा प्रयत्न करताच त्यांनी ‘खबरदार... वर आलात तर खाली उडी घेईन’, अशी धमकी दिली. त्यामुळे पोलीस दडपणात आले. दरम्यान, प्रशासनाला ‘शोले आंदोलन’ कळल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक अधिकाऱ्यांनी टॉवरकडे धाव घेतली. महिलेला खाली येण्याची सर्व जण विनंती करीत होते. याचवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारही तेथे पोहचले. परिणामी वीरूगिरी करणाऱ्या येवले मोठमोठ्यात घोषणाबाजी करू लागल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांची दखल घेऊन त्या पूर्ण कराव्या, अशी त्यांची मागणी होती. त्यांची कशी बशी समजूत काढत खाली उतरण्यासाठी राजी करण्यात आले. तब्बल दीड तासानंतर त्या खाली उतरल्या. दरम्यान, खाली गोंधळ वाढला असतानाच पोलिसांनी एका कॅमेरामनला मागे खेचले. त्याला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांनी भाईगिरी करीत पत्रकारांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत केले. सोनू येवले यांना नंतर ताब्यात घेऊन त्यांची मुक्तता करण्यात आली.
सोनूबाई चढल्या टॉवरवर
By admin | Published: December 10, 2015 3:00 AM