लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी म्हटले की, फटाक्यांची आतषबाजी. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते. दरवर्षी असे सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. अचानक फुटणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे गर्भवतींनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळेच फटाके फोडताय पण सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मानवी शरीरावरही गंभीर परिणाम होतात. आपले कान हे साधारणपणे ३० ते ४० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. मात्र, विविध आवाजाचे फटाके हे १५० ते १६० डेसिबलपर्यंत आवाज करणारे असतात. त्या आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे यांपासून कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतात. मेडिकलमध्ये दरवर्षी दिवाळीदरम्यान असे रुग्ण हमखास येतात. तात्पुरते बहिरेपण आल्यास औषधोपचाराने ते काही दिवसांमध्ये पूर्ववत होऊ शकतात. मात्र, कायमस्वरूपी बहिरेपणही येऊ शकते. त्याच वेळी फटाक्यांच्या रसायनयुक्त धुरामुळे नाक, कान, घसा व फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, खाज सुटणे आदी समस्याही निर्माण होतात.
-अचानक फुटणारे फटाके कानासाठी घातक-डॉ. दंदे
डॉ. पिनाक दंद यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे कानांच्या समस्यांनी त्रस्त किमान पन्नासवर रुग्ण येतात. जेव्हा १५०-१६० डेसिबलचे फटाके माहीत नसताना अचानक कानाजवळ फुटतात तेव्हा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. औषधांनी काही अंशी कानांची श्रवण क्षमता आणली जाऊ शकते. अशा रुग्णांसाठी ऑडियोमेट्री तपासणी आवश्यक ठरते.
फटाक्यांपासून होणारे नुकसान
नायट्रेट - मज्जातंतू निष्क्रियता, नायट्रिट-बेशुद्ध होणे, लेड (शिसे) - मज्जातंतूवर दुष्परिणाम, कॅडमियम - रक्तातील लोहाचे प्रमाण घटणे, किडनी निष्क्रिय होणे, सोडियम - त्वचेचे विकार, झिंक - उलट्या होणे, कॉपर - श्वसननलिकेचा विकार, मॅग्नेशियम - त्वचेचे विकार. ध्वनिप्रदूषणामुळे कर्णबधिरतेसह रक्तदाब वाढणे, हृदयविकार, झोपमोड असे परिणाम दिसून येतात.
अशी घ्या काळजी
शक्यतो फटाक्यांना दूरच ठेवा. फटाक्यापासून सुरक्षित अंतरावर उभे रहावे. पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे. बालकांना दूर ठेवा. मोकळ्या जागेत फटाके फोडा. शक्यतो सुती कपडे घाला व पायात बूट वापरा. कानांमध्ये बोळे ठेवा, बोळ्यांमुळे ५० टक्के आवाजात घट होते. कुठलीही समस्या झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.