नागपूर : मिहानच्या अत्याधुनिक एमआरओमध्ये एअर इंडियाच्या विमानांची दुरुस्ती व देखभाल याच ठिकाणी उभ्या असलेल्या जुन्या विमानांचे सुटे भाग काढून करण्यात येत आहे. यावरून एअर इंडियाची स्थिती किती खराब झाली आहे, याचा अंदाज येतो.
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी विदेशात फेऱ्या मारणारे एक बोईंग ७७७ विमान सी-चेकसाठी एमआरओमध्ये आणण्यात आले. विमानाची जास्त दुरुस्ती असल्याने वेळही जास्त लागणार होता. सूत्रांनी सांगितले की, अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी जवळपास २५ दिवस लागतात. विमानाचे सुटे भाग खरेदी करण्यासाठी निधीची समस्या आहे. त्यामुळे जुन्या विमानांचे सुट भाग काढून बोईंग-७७७ विमानात लावण्यात येत आहेत. यामुळे एक वर्षापूर्वी दुरुस्तीसाठी आलेल्या एका जुन्या विमानाचे अर्ध्यापेक्षा जास्त सुटे भाग काढण्यात आले. आर्थिक समस्यांसह संसाधनांच्या कमतरतेमुळे निर्धारित वेळेत दुरुस्ती व देखभालीचे काम होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे कोरोना संसर्गाने ही समस्या आणखी वाढली आहे.