बंद पाडण्याची भाषा करता करता आता राष्ट्रवादीच्याच दुकानाचा पाठिंबा घेण्याची नाना पटोलेंवर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 07:00 AM2022-01-20T07:00:00+5:302022-01-20T07:00:08+5:30
महाविकास आघाडीतील मित्रपक्षावर टीका करताना पटोले यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुकान बंद करण्याची घोषणा केली होती. पण आता त्याच दुकानाची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली हे नक्की.
गणेश खवसे
नागपूर : ओबीसी मतदारांचा प्रचंड प्रभाव असलेल्या विदर्भात नगरपंचायतींच्या निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. अकरा जिल्ह्यांमधील एकूण ३८ नगरपंचायतींपैकी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींचा कौल आज, गुरुवारी बाहेर येईल. बुधवारी निकाल लागलेल्या २९ नगरपंचायतींपैकी जवळपास निम्म्या काँग्रेसने जिंकल्या. विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार या मंत्र्यांनी चंद्रपूर, अमरावती व नागपूरमधील बालेकिल्ले राखले; पण यापेक्षा विधानसभेची एकही जागा ताब्यात नसताना यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे यश सर्वांनाच अचंबित करणारे आहे.
बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी मोताळा नगरपंचायत जिंकली. तथापि, राज्याचे लक्ष भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीकडे लागून होते आणि दोन्हीपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. गोंदियात सत्तांतर दृष्टिक्षेपात असून भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला आहे.
भंडाऱ्यात ५२ पैकी २२ जागा जिंकून काँग्रेस जिल्हा परिषदेतील सत्तेचा दावेदार असला तरी त्यासाठी १२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पदरात मतदारांनी टाकलेला हा काव्यगत न्याय म्हणता येईल. कारण, महाविकास आघाडीतील मित्रपक्षावर टीका करताना पटोले यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुकान बंद करण्याची घोषणा केली होती. बुलडाण्यात बोलताना त्यांनी ही आक्रमक भाषा वापरली खरी; पण ती तिथल्या डॉ. राजेंद्र शिंगणेंसाठी होती, की नागपूरमधील अनिल देशमुखांसाठी होती की गोंदियातील प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी होती, हा भाग अलहिदा. पण, कोणासाठीही असली तरी आता त्याच दुकानाची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली हे नक्की. गोंदियात त्या बदल्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत करायचे ठरविले तर सत्ता दिसते तितकी सोपी नाही.