लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पेडियाट्रिक सर्जरी विभागाच्या पुढाकाराने ‘बालशल्य मिशन-२०१८’ला सोमवारपासून सुरुवात झाली. यात विदर्भातील १५० बालरुग्णांवरील शस्त्रक्रियेला प्रारंभ झाला. यात मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांसह जर्मनी, अमेरिका व स्वित्झर्लंडचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी विविध आजाराच्या आठ बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.मेडिकलमध्ये आयोजित ‘बालशल्य मिशन’चे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, पेडियाट्रिक सर्जरी विभागाचे डॉ. राजेंद्र सावजी, डॉ. नीलेश नागदिवे व डॉ. चारू शर्मा उपस्थित होते. डॉ. निसवाडे यांनी यावेळी ‘बालशल्य मिशन’ला शुभेच्छा दिल्या.डॉ. नीलेश नागदिवे यांनी या ‘मिशन’विषयी माहिती दिली. ते म्हणाले, विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला आदी भागातील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या १५० बालरुग्णांची तपासणी करून त्यांना मेडिकलमध्ये आणले. यात ज्या बालकांचे कुबड निघाले आहे, जन्मत:च लघवीची पिशवी नाही, अन्ननलिका तयार झाली नाही, यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया ‘बालशल्य मिशन’अंतर्गत त्यांच्यावर विशेष शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु चार दिवसांत एवढ्या शस्त्रक्रिया शक्य नसल्याने मागील काही दिवसांत यातील ४२ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सोमवारी या मिशनच्या पहिल्या दिवशी पाठीच्या मणक्याच्या दोन, लघवीच्या आजाराची एक व अन्ननलिकेच्या आजाराची एक अशा चार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तर चार किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मिशनअंतर्गत शस्त्रक्रियेत पेडियाट्रिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांसह डॉ. डेव्हिड अंतेकायर (अमेरिका), डॉ. लॉरेन्स सेसीक (स्वित्झर्लंड), डॉ. स्टीफन रोहेल्डर (जर्मनी) डॉ. अश्विन पिंपळवार (अमेरिका), डॉ. जेम्स बुलक्स (अमेरिका), डॉ. बिंदी नायक (अमेरिका) डॉ. आर. कासेट्टी (अमेरिका) डॉ. गीता दास (अमेरिका) यांच्यासह या तीनही देशातून ‘स्पेशलाईज पेडियाट्रिक’ व ‘न्यूओनेटल नर्सिंग स्टाफ’सहभागी झाले आहेत.
नागपुरात १५० वर बालकांवर होणार विशेष शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:20 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पेडियाट्रिक सर्जरी विभागाच्या पुढाकाराने ‘बालशल्य मिशन-२०१८’ला सोमवारपासून सुरुवात झाली. यात विदर्भातील १५० बालरुग्णांवरील शस्त्रक्रियेला प्रारंभ झाला.
ठळक मुद्देमेडिकलमध्ये बालशल्य मिशन : जर्मनी, अमेरीका व स्वित्झर्लंड येथील डॉक्टरांचा सहभाग