हावडा-मुंबई, हावडा-अहमदाबादसाठी विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:50 AM2020-09-14T09:50:51+5:302020-09-14T09:52:01+5:30
रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
रेल्वे बोर्डाने रेल्वे वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. रेल्वेत लॉकडाऊन संपल्यानंतर सुरुवातीला २३० रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. त्यानंतर आता १२ सप्टेंबरपासून ८० रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. ८० वरून ही संंख्या ८६ करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक वाढविण्यासाठी ज्या गाड्या आठवड्यातून एक दिवस धावत होत्या त्या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शनिवारपासून लागू करण्यात आला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलचा समावेश आहे. सोबतच रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा या विशेष रेल्वेगाडीला आता आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी आपल्या नियोजित वेळेनुसार हावडावरून धावणार आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०२८०९ आता बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी मुंबईवरून धावणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी हावडावरून तर रेल्वेगाडी क्रमांक ०२८३३ शुक्रवार, सोमवार आणि बुधवारी अहमदाबादवरून धावणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या वेळेत कुुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या चारही रेल्वेगाड्या १ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या २३० रेल्वेगाड्यात समाविष्ट होत्या. या गाड्या दररोज धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मागील दोन महिन्यापासून या गाड्या आठवड्यातून एक दिवस चालविण्यात येत होत्या.