लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर् - व्यवसायाला भरभराट आणण्याचे स्वप्न दाखवून कळमन्यातील एका मसाला उद्योजकाला भिवंडी (ठाणे) येथील भामट्यांनी १५ लाखांचा चुना लावला.
रवी वामन बुरडे (वय ३८) असे फसगत झालेल्या उद्योजकांचे नाव आहे. ते मानेवाड्यातील लवकुशनगरात राहतात. कळमन्यात त्यांचा मसाल्याचा कारखाना (गृहउद्योग) आहे. २२ जानेवारीला सकाळी त्यांना हितेश कमलेश गाैतम (वय २८, रा. भिवंडी, ठाणे) याचा फोन आला. तुम्ही डी मार्ट मध्ये तुमचे उत्पादन विकायला काढल्यास तुमची व्यावसायिक भरभराट होईल,असे सांगितले. बुरडे यांनी तयारी दाखवताच पेमेंट कंडिशन सांगितली. त्याला संमती दिल्यानंतर त्याने बुरडेंच्या व्हॉटस्ॲपवर हळद, मिरची पावडर, धने पावडरची ऑर्डर दिली. त्यानुसार बुरडे यांनी आरोपीने दिलेल्या पत्त्यावर ११ लाख, ७० हजारांचा माल दोन टप्प्यात पाठवला. काही दिवसानंतर बुरडे यांनी आरोपी हितेश गाैतमला मालाचे पेमेंट मागितले असता त्याने तुमचा व्हेंडर कोड जनरेट करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करावे लागेल, त्यासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले. त्यामुळे बुरडे यांनी आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यात तीन लाख रुपये जमा केले. त्यानंतर हितेशने राजेश जैन नामक आरोपीचे डिटेल्स देऊन त्याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. बुरडेंनी राजेशसोबत संपर्क केला असता त्याने तुम्ही आधी कंपनी डिपॉजिट, जीएसटी तसेच पहिल्या बिलाची जीएसटी असे एकूण २ लाख, ४२ हजार जमा करा, त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण रक्कम परत मिळेल, असे म्हटले. प्रत्येक वेळी आरोपी वेगवेगळी सबब सांगून रक्कम उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याने बुरडेंना शंका आली. त्यामुळे त्यांनी थकीत पेमेंटमधून ती कापून बाकी रक्कम परत करायचा सल्ला दिला. मात्र,आरोपींनी त्याला नकार देऊन बुरडेंशी १ मार्चपासून संपर्क तोडला. त्यानंतर त्यांनी कळमना ठाण्यात तक्रारअर्ज दिला. त्याची चाैकशी केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.
सराईत टोळीचे कृत्य
बुरडे यांची फसवणूक करणारे हितेश गाैतम आणि राजेश जैन हे दोनच चेहरे समोर आले असले तरी त्यांची कार्यपद्धती लक्षात घेता आरोपींची
एक टोळीच असावी आणि ते अशा प्रकारे अनेकांना गंडवत असावे, असा संशय आहे. पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.