लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात घडलेल्या घटनांची आठवण वारंवार त्यांच्या मनात घोळत असते व त्यातून नैराश्य, मानसिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांना कोणत्यातरी कामात गुंतवून त्यांच्या मनातून नकारात्मक विचार काढावे, या उद्देशाने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांचे निरीक्षण गृह येथे ‘अंकुर प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे.विधिसंघर्षग्रस्त मुलांना ‘जे पेराल ते उगवेल’ या म्हणीचा अर्थ समजावा, त्यांच्यात स्वयंशिस्त लागावी व समाजहिताचे विचार मनात निर्माण व्हावे, हे ध्येय ठेवून बाल न्याय मंडळाने बाल निरीक्षण गृहात २१ जुलै २०२० पासून ‘अंकुर प्रोजेक्ट’ला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात बालकांना विविध भाज्यांची व झाडांची लागवड व उगवण करण्यात प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच मशरूम लागवड व मशागतदेखील निरीक्षण गृहात एका खोलीमध्ये येथील मुले उत्तमरीत्या करीत आहेत. या उपक्रमात मुलांनी वाफे तयार करून त्यामध्ये पालक, मेथी, टमाटर, मिरची, अद्रक या सारख्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यांच्यात स्वयंशिस्त व काळजी या दोन गोष्टींची बीजे रुजावीत यासाठी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून त्यात मुलांनी दाखविलेली आवड प्रशंसनीय आहे. रोपट्यांची व झाडांची देखरेख त्यांच्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली आहे.हा प्रकल्प बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू असून अंकुर प्रकल्पासाठी निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका नम्रता चौधरी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. या उपक्रमातील विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनास योग्य दिशा मिळावी हा बाल न्याय मंडळाचा उद्देश आहे. यापूर्वी एका प्रकरणात बाल न्याय मंडळाने सेवाकार्य तसेच बागकाम करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय यापूवीर्ही बाल न्याय मंडळाने विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरले होते हे विशेष.मुलांचे होते समुपदेशनकोविड-१९ च्या काळातही बाल न्याय मंडळाचे काम अविरत सुरू असून दररोज प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. विविध प्रकरणात न्यायदंडाधिकारी शर्वरी महेश जोशी व दामोदर यादवराव जोगी समुपदेशनाद्वारे मुलांना शिक्षण, पुनर्वसन व त्यांच्या भावी आयुष्याबाबत समजावून सांगितले जाते. विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात समाजाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी हा हेतू आहे.
नागपुरात विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या जीवनात ‘अंकुर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:46 AM