एसआरपीएफचे डीआयजी महेश घुर्ये यांना पदक प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:12 PM2019-07-25T23:12:58+5:302019-07-25T23:20:04+5:30
पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल राज्य राखीव दलाचे महानिरीक्षक (डीआयजी, एसआरपीएफ) महेश घुर्ये यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मानाचे पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल राज्य राखीव दलाचे महानिरीक्षक (डीआयजी, एसआरपीएफ) महेश घुर्ये यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मानाचे पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
राज्य पोलीस मुख्यालयात संपन्न झालेल्या या पोलीस अलंकरण समारंभास मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद विरोधी कारवाई केल्याबद्दल घोषित राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदके राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घोषित झाली होती. या पदकांचा वितरण समारंभ राज्यपाल राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पार पडला. नागपूरला राज्य राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले महेश घुर्ये यांचाही त्यात समावेश होता. घुर्ये २००५ च्या भारतीय पोलीस तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मूळचे मुंबईतील रहिवासी असलेले घुर्ये १९९३ ला थेट डीवायएसपी म्हणून ते पोलीस सेवेत रुजू झाले. २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यातील वीर हुतात्मा अशोक कामटे साताऱ्याला पोलीस अधीक्षक असताना घुर्ये तेथे प्रोबेशनरी डीवायएसपी म्हणून रुजू झाले. त्यानंतर सोलापूर आणि अमरावती ग्रामीणला ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवारत होते. २००२ मध्ये सोलापूरला एसीपी (क्राईम) असताना त्यांनी कर्नाटकमधील हुबळीत जाऊन तेथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा मारला होता. ही कारवाई त्यावेळी देशभरात चर्चेला आली होती. त्यानंतर त्यांची पदोन्नतीवर सीआयडी पुणे येथे बदली झाली. पुण्यातच त्यांनी नंतर डीसीपी झोन - १ आणि डीसीपी ट्रॅफिक म्हणून जबाबदारी सांभाळली. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची मुंबईत डीसीपी म्हणून बदली झाली. त्यानंतर त्यांनी एसपी, एसआयडीचीही जबाबदारी पार पाडली. नंतर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी नंदूरबार जिल्ह्यात अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. तेथून पदोन्नतीवर ते नागपूरला डीआयजी एसआरपीएफ म्हणून बदलून आले.
पत्रकारितेतही स्वारस्य !
कायद्याची पदवी प्राप्त करणारे डीआयजी महेश घुर्ये यांनी पत्रकारितेचाही अभ्यासक्रम (फोटो जर्नलिस्ट) पूर्ण केला आहे. त्यांना पत्रकारितेत विशेष स्वारस्य आहे. राज्य पोलीस दलाचे मुखपत्र असलेल्या ‘दक्षता’चे मुख्य संपादक म्हणूनही त्यांनी एप्रिल २०१९ म्हणून सेवा दिली आहे.
गडचिरोलीतील शहिदांना मरणोत्तर शौर्यपदक
या समारंभात गडचिरोलीतील शहिदांना मरणोत्तर शौर्यपदक प्रदान करण्यात आले. गडचिरोली मधील हिक्केर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या दोगे डोलू आत्राम व स्वरुप अशोक अमृतकर यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले होते. या शहिदांच्या कुटुंबीयांना या समारंभारत पदक प्रदान करण्यात आले.