लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने आमची विनंती मान्य केली असती तर आमच्या सहा सहकाऱ्यांचा जीव गेला नसता. बरेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला नसता. यासंदर्भात त्यांनी ४ मार्च रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र लिहून कोरोना वॅक्सिन लावण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती.
हे निवेदन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेमार्फत देण्यात आले होते. तेव्हा प्रशासनाने गंभीरतेने पावले उचलली असती तर एकाही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नसता. आताही कर्मचाऱ्यांचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. विद्यापीठ प्रशासनाने तेव्हा लसीकरणासाठी व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व मनपाला पत्र पाठविले होते. परंतु त्यांच्याकडूनही कुठलीही व्यवस्था झाली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊ शकले नव्हते. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाने पत्र पाठवून केवळ आपले कार्य केले. त्याकडे गांभीर्याने बघितले नाही.