काटाेल : शहर व तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथील विलगीकरण कक्षात ५० बेडची व्यवस्था असल्याने इतर रुग्णांची गैरसाेय हाेते. त्यामुळे काटाेल येथे अन्य दुसरे विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी सिटीझन फाेरमतर्फे निवेदनाद्वारे केली आहे.
काटाेल शहर व तालुक्यात दरराेज २०० च्या वर रुग्ण पाॅझिटिव्ह येत आहेत. न.प. शाळा क्र. ६ येथील विलगीकरण कक्षात ५० बेडची व्यवस्था असल्याने, ५० पेक्षा अधिक रुग्णांना ठेवणे शक्य हाेत नाही. त्यामुळे काही रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. परंतु झाेपडपट्टी व लहान घरांमध्ये रुग्णांना विलगीकरणात ठेवणे शक्य नाही. यामुळे रुग्णाचे कुटुंब बाधित हाेण्याची शक्यता असते. तसेच काही पाॅझिटिव्ह रुग्ण शहरात खुलेआम वावरतात. त्यामुळे शहरात तातडीने दुसरे विलगीकरण कक्ष सुरू करावे, अशी मागणी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी अजय चरडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना सिटीझन फाेरमचे प्रा. विजय कडू, डॉ. अनिल ठाकरे, प्रताप ताटे, विजय महाजन, गणेश लवणकर, ॲड. मुकुल दुधकवडे, अनिकेत अंतुरकर आदी उपस्थित हाेते. साेबतच जिल्हाधिकारी व आराेग्य विभागाला पत्र देऊन विलगीकरण कक्ष, डाॅक्टर व इतर सुविधा तातडीने देण्याची मागणीही फाेरमने केली आहे.