विदर्भात रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प सुरू करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:08 AM2021-01-14T04:08:26+5:302021-01-14T04:08:26+5:30
नागपूर : विदर्भात जवळपास २ लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेला रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स अर्थात रिफायनरी प्रकल्प विदर्भात ...
नागपूर : विदर्भात जवळपास २ लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेला रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स अर्थात रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या (वेद) पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या प्रकल्पाबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करून सक्षमता अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी वेदच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या प्रकल्पामुळे विदर्भातील अर्थव्यवस्थेला कसा लाभ होईल, याची सविस्तर माहिती फडणवीस यांना दिली.
रिफायनरी व पेट्रोकेमिल प्रकन्प सुरू करण्यासाठी वेदचे प्रदीप माहेश्वरी यांनी प्रोजेक्ट तयार केला असून त्यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प विदर्भात विशेषत: नागपुरात येण्यासाठी वेदचे पदाधिकारी अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. प्रदीप माहेश्वरी म्हणाले, नाणार येथील रिफायनरीला शिवसेनेने विरोध करताच तीन वर्षांपूर्वी विदर्भातील आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा प्रकल्प विदर्भात स्थापन करण्याचे आवाहन केले होते. हा प्रकल्प विदर्भात न्या, असे आवाहन विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तेव्हा केले होते. या प्रकल्पाची आता चर्चा सुरू झाली आहे.
वेदचे प्रकल्पावर सादरीकरण,
पटेल व देशमुख अनुपस्थित
रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेसची माहिती देण्यासाठी वेदने रविवारी चिटणविस सेंटरमध्ये प्रकल्पावर सादरीकरण ठेवले होते. याकरिता गृहमंत्री अनिल देशमुख आणि खा. प्रफुल्ल पटेल यांना आमंत्रित केले होते. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाही. पुढील वेळी निश्चितच हजर राहण्याचे आश्वासन त्यांनी वेदच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. माहेश्वरी म्हणाले, हा प्रकल्प ९० हजार ते एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहू शकतो. यातून दोन लाखांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपब्ध होऊ शकतो. त्यामुळे विदर्भ विकासाला बळ मिळू शकते.
फडणवीस यांना प्रकल्पाची माहिती देतेवेळी वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव, उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, कोषाध्यक्ष नवीन मालेवार, सचिव वरुण विजयवर्गी, माजी अध्यक्ष देवेंद्र पारख, दत्तात्रय गारवे, राजीव अग्रवाल उपस्थित होते.