नागपूर: संस्कृतमध्ये देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून विविध प्रकारचे स्टार्ट अप उद्योग संस्कृतच्या माध्यमातून नव्या पिढीने सुरू करण्याचे आवाहन राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ११ वा दीक्षांत समारंभात राज्यपालांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून काठमांडू येथील नेपाळ संस्कृत विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. काशीनाथ न्योपाने, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.मधुसूदन पेन्ना, कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, संस्कृत विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. नंदा पुरी, परीक्षा नियंत्रक डॉ. स्मिता फडणवीस, विद्यापीठाच्या विविध शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्वत्त परिषदेचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. दर्शनादी शास्त्रे, योग, आयुर्वेद याचे आता जगभरात आकर्षण निर्माण झाले असून राष्ट्रहितासाठीच नाही तर मानवहितासाठी संस्कृत कटिबद्ध असल्याचे कोश्यारी यावेळी म्हणाले.
समारंभादरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांतोपदेश प्रदान केला. या दीक्षांत समारंभात २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक तसेच पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. यात कुलपती सुवर्णपदकाने वैष्णवी मुकुंद पांडे यांचा गौरव करण्यात आला. प्रा. काशीनाथ न्योपाने यांनीही यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दीक्षांत समारंभाच्या प्रास्ताविकात प्रभारी कुलगुरू प्रा.मधुसूदन पेन्ना यांनी विद्यापीठाचा प्रगतीविषयक अहवाल सादर केला. संचालन प्रा. पराग जोशी यांनी केले.
कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांना मानद डी.लिट
या दीक्षांत समारंभात संस्कृतशास्त्रे, संगणकीय भाषाविज्ञान, नव्यन्याय, भारतीय ज्ञान प्रणाली, दर्शनशास्त्रासह संस्कृत व उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद विद्यावाचस्पती (डी.लिट) प्रदान करून गौरव करण्यात आला.
३,३१७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणे प्रदान
११ व्या दीक्षांत समारंभात ४६५ पदव्युत्तर पदवी, १,१५६ पदवी, १,१७४ पदविका, १२४ पदव्युत्तर पदविका, १११ प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायमपीठम् द्वारा १८० प्रमाणपत्र, २३ पदविका प्रमाणपत्र, ६८ पदवी प्रमाणपत्र अशी एकूण ३,३१७ पदवी प्रमाणपत्रे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. याशिवाय १५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.पदवी तसेच चार संशोधक विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने राज्यपालांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले.