आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:08+5:30
हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सोमवार १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सोमवार १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.
विधान मंडळाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीस विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुदेश मेश्राम, विधानसभेचे अवर सचिव रवींद्र जगदाळे, विधीमंडळाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानभवन, रविभवन आमदार निवास परिसरावर सीसीटीव्हीने नजर
विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त करावयाच्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मागील बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या बाबींवर केलेली कार्यवाही विषयक माहिती देण्यात आली. यामध्ये विधान भवन आमदार निवास व रविभवन तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ५४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. तसेच मोर्चाच्या ठिकाणी पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी ४५ मोर्चाचे निवेदन व ३३ धरणे आंदोलनाची नोंद झालेली असून त्याठिकाणी सुरक्षा आणि इत्तर आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष
महिला आमदारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या निवासस्थानी महिला सेविका आणि पर्यवेक्षक नेमावे अशी सूचना उपसभापती नीलम गोºहे यांनी केली. यावेळी त्या म्हणाल्या, आमदार निवासी राहणार असणाºया आणि नसणाºया महिला आमदारांची नोंद घेऊन त्याच्या सहमतीने राहत असलेल्या इत्तर व्यक्तीची नोंदवहीत नोंद घेण्यात यावी. त्याबरोबर अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असणाºया महिला पोलिसांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपसभापती गोºहे यांनी केल्या.
स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना
विधानमंडळ परिसर, आमदार निवास, रविभवन तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणी पुरवठ्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विधिमंडळ परिसरात निर्माणाधीन असलेल्या वास्तूच्या उभारणीत विविध सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून विधिमंडळ सुरक्षेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
.
पासेसशिवाय कुणालाही प्रवेश नाही
अधिवेशन कालावधीत अधिकृत सुरक्षा पासेसशिवाय परिसरात प्रवेश राहणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी आणि संबंधितांनी सुरक्षा पास जवळ बाळगावेत. विधानभवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल छायाचित्र घेणारी अत्याधुनिक यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. स्कॅनर्स मशीनसुध्दा बसविण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. अधिवेशन काळात विधान भवन, विधान भवनाबाहेरील परिसर, आमदार निवास, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत व बाह्य सुरक्षा चोख ठेवण्यात आली असून, गाड्यांचा पार्किंगची व्यवस्थासुध्दा करण्यात आल्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. विधान भवन, रविभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार भवन येथे वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच २११ डॉक्टर, नर्सेस यांचे वैद्यकीय पथक अधिवेशनात उपलब्ध करुन देण्यात आले असून रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे अशी महिती वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी दिली.
रविभवनातील कॉटेज भाड्यावर
रविभवन येथील मंत्र्यांचे कॉटेजेस अधिवेशनानंतर फारसे वापरात येत नाही. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि कॉटेज उत्तम राहण्यासाठी ते भाड्याने देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठकीत दिला. त्याचबरोबर पुढील काळात विधान भवन नागपूर अशी आस्थापना निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.