लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान व नैसर्गिक आपत्तींचा अगोदर अंदाज लावता येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हीच बाब लक्षात घेऊन कुठल्याही आपत्तीची अगोदर माहिती मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे नागपुरातील मिहान परिसरात अत्याधुूनिक राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी सोळाशे कोटींचा खर्च अपेक्षित असून यात जगातील विकसित यंत्रणा राहणार आहे. सर्वसाधारणत: दीड वर्षात हे केंद्र कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचे पाऊस, चक्रीवादळ इत्यादींबाबतचे अंदाज चुकतात व त्यामुळे वारंवार समस्या निर्माण होतात. यासंदर्भात तंत्रज्ञानाच्या मदतीने आगावू सूचना मिळावी यासाठी नागपुरात हे राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. मुसळधार पाऊस, चक्रीवादळ इत्यादींबाबत येथून अगोदरच इशारा जारी होईल. इस्त्रायलसह जगातील विकसित यंत्र व तंत्रज्ञानाचा यात उपयोग करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
हे केंद्र १० एकर जागेत उभारण्यात येणार आहे. जागेसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडूनदेखील निधी देण्यात येतो. त्याचा उपयोग या केंद्रात करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
नुकसानीचे पंचनामेदेखील होणार
अतिवृष्टी, चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यानंतर पीडितांना भरपाई देण्यासाठी पंचनामे आवश्यक असतात. हे पंचनामे अचूक होतीलच याची शाश्वती नसते. या केंद्रातील तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी सूक्ष्मपणे पाहणी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक आकडेवारी समोर येऊ शकते.