राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची अंबाझरी तलावात चित्तथरारक प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:11 AM2021-02-17T04:11:14+5:302021-02-17T04:11:14+5:30
नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने नागपुरात सुरू असलेल्या प्रात्यक्षिकांअंतर्गत मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावाच्या खोल पात्रात जवानांनी चित्तथरारक ...
नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने नागपुरात सुरू असलेल्या प्रात्यक्षिकांअंतर्गत मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावाच्या खोल पात्रात जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. ६ मार्चला राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन समारंभ पुणे येथे पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत होणार आहे. यात राज्य राखीव पोलीस दल नागपूर परिक्षेत्र, पुणे परिक्षेत्रामधील १६ युनिट सहभागी होत आहेत. या अंतर्गत फिल्ड क्राफ्ट स्पर्धा नागपुरात घेतल्या जात आहेत. या अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि धुळे अंतर्गत १५ व १६ ला फ्लड वॉटर रेस्क्यू, कॉल्पस स्ट्रक्चर सर्च तसेच हाय रिस्क रेपो सर्च या स्पर्धा झाल्या. मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत अंबाझरी तलावात पोलीस निरीक्षक (प्रशासन) ललित मिश्रा यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक नेमाणे, मोरला यांच्यासह २६ रेस्क्युअरनी फ्लड वॉटर रेस्क्यूची चित्तथरारक प्रात्यक्षिके केली.
सायंकाळी पोलीस प्रशिक्षण विद्यालयात हाय रिस्क रेस्क्यूचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मिश्रा यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मडावी व कालसर्पे यांच्यासह २९ अंमलदारांनी स्पर्धेत सहभाग घेऊन चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १३ चे समादेशक डॉ. पवन बन्सोड, डेप्युटी कमांडट डॉडियल यांनी केले.
...
आदर्श कूक स्पर्धा
१५ फेब्रुवारीच्या सायंकाळी आदर्श कूक स्पर्धा झाली. यात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ जालना, गट ४ नागपूर, गट ६ धुळे, गट ९ अमरावती, गट १२ हिंगोली, गट १३ वडसा, गट १४ औरंगाबाद, १५ गोंदिया येथील भोजन सेवक, सहाय्यक व मुख्य स्वयंपाकी यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना ६ मार्चला होणाऱ्या समारंभात पोलीस महासंचालकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.