लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्वांना आर्थिक झळ पोहोचल्याचे चित्र आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची याही काळात चांगलीच चांदी असल्याचे दिसून येते. शनिवारी दिवसभरात मद्यपींना परवाने उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात एकाच दिवशी या विभागाला ५ लाख, ७० हजार, ५०० रुपयांचा महसूल मिळाला आहे.नागपूर जिल्ह्यातील मद्याची दुकाने सुरू झाल्यापासून एकीकडे या दुकानांवर मद्यपींच्या उड्या पडत आहे. दुसरीकडे मद्य पिण्याचा परवाना मिळावा म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात रांगा बघायला मिळत आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग चांगलेच व्यस्त झाल्याचे चित्र आहे. नागपूरचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य पिण्याचा परवाना मिळावा म्हणून शेकडो मद्यपी या कार्यालयात अर्ज देत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मुदतीच्या अर्जासाठी मद्यपींना विशिष्ट रक्कम या विभागाकडे जमा करावी लागते. आयुष्यभरासाठी मद्य पिण्याचा परवाना मिळावा म्हणून शनिवारी ५६७ जणांना, तर एका वर्षासाठी ३५ जणांना मद्य पिण्याचे परवाने देण्यात आले. त्यातून उत्पादन शुल्क विभागाला ५ लाख, ७९ हजार, ५०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. अजूनही शेकडो अर्ज विचाराधीन आहेत.दारुबंदी मोहीम१८ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी छापे मारले आणि अनेक मद्य विकणाऱ्यांना पकडले. त्यांच्यावर एकूण ४२५ गुन्हे दाखल करण्यात आले. ३०९ आरोपींकडून १७२ वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने, देशी विदेशी मद्य आणि इतर जप्त केलेला मुद्देमालाची किंमत १ कोटी, ७९ लाख, ३८ हजार रुपये असल्याचे माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी दिली आहे. अधीक्षक प्रमोद सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.