नागपुरमधील लाकूड व्यापाऱ्यावर राज्य जीएसटीचा छापा; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 3, 2024 11:17 PM2024-01-03T23:17:52+5:302024-01-03T23:18:28+5:30
कापसी-लकडगंज येथील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
नागपूर : शहरातील एका आघाडीच्या लाकूड व्यावसायिकावर राज्याच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईमुळे लकडगंज आणि कापसी येथील लाकूड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बऱ्याच कालावधीनंतर ही कारवाई होत असल्याने लाकूड बाजारात विविध चर्चेला उधाण आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकासह सकाळी विनोद गोयनका नावाच्या लाकूड व्यावसायिकाच्या भंडारा रोडच्या ६८/२, कापसी खुर्द येथील युनिटवर छापा टाकला. याशिवाय गोयनका यांच्या इतर दोन ते तीन ठिकाणीही ही कारवाई करण्यात आली. या काळात कागदपत्रे तपासण्याचे काम दिवसभर सुरू होते. राज्य जीएसटी विभाग, मुंबईच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे प्रकरण बनावट बिलांद्वारे जीएसटी चोरीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जीएसटी न भरला सरकारी विभागांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारवाईबाबत विनोद गोयनका यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू
वित्त मंत्रालयाने अलीकडेच सर्व राज्यांच्या जीएसटी विभागांना बनावट जीएसटी बिले आणि आयटीसी बनवणाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. नागपुरातही ५०० हून अधिक खातेदारांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सापडलेल्या बड्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने विनोद गोयनका यांच्यावरही कारवाई होत असल्याची माहिती समोर येत आहे.