लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आमदार पुत्र जयदीप कवाडे यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर मोठे कुंकू लावून व तोंडावर पट्टी बांधून संविधान चौकात ‘मूक’निषेध केला. दुसरीकडे जयदीप कवाडे यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगासोबतच महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लकडगंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली व लगेच जामिनावर सुटकादेखील झाली.बगडगंज भागातील कुंभारपुरा येथे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचार सभेत कवाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, अशा शब्दांत कवाडे यांनी पातळी सोडून टीका केली होती. या संदर्भात भाजपच्या महिला नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी आश्विन मुदगल यांनी संबंधितांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघाच्या भरारी पथकाचे प्रभारी मदन सुभेदार यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कवाडेविरुद्ध महिलेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कवाडे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली. भविष्यात शांती व्यवस्था कायम ठेवण्याचा सल्लादेखील देण्यात आला. पोलिसांनी कवाडे यांनी दिलेल्या भाषणाची सीडीदेखील जप्त केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील कुठल्याही नेत्याविरोधात दाखल झालेले हे पहिले प्रकरण आहे.कुंकवाचा अपमान सहन करणार नाहीदरम्यान, याविरोधात बुधवारी भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दुपारी ४ वाजता संविधान चौकात एकत्रित आल्या. काळ्या साड्या घालून आलेल्या या सर्व महिलांनी तोंडावरदेखील काळी पट्टी बांधली होती. तसेच प्रत्येक महिलेच्या कपाळावर मोठे कुंकू होते. ‘माझ्या कुंकवाचा अपमान मी सहन करणार नाही’ असे बॅनर हातात घेऊन त्यांनी ‘मूक’निषेध केला. भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा किर्तीदा अजमेरा, माजी महापौर अर्चना डेहनकर, संध्या ठाकरे, लता येरखेडे, नीता ठाकरे, सीमा ढोमणे, पूजा तिवारी, प्रीती राजदेरकर, अनसूया गुप्ता, मंगला गोतमारे, वर्षा चौधरी, कल्पना तडस, सपना तलरेजा, आशा गुप्ता, हर्षा जोशी, वर्ष पैकडे, कल्याणी तेलंग, प्रतिभा वैरागडे, उमा पिंपळकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्या या यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.महापौरांनी केली पोलिसांत तक्रारसायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महापौर नंदा जिचकार यांनी कवाडे तसेच काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. कवाडे यांच्या भाषेमुळे भारतीय स्त्री संस्कृतीचा अपमान करण्यात आला आहे. पटोले यांनी अशी भाषा वापरणाऱ्या कवाडे यांची पाठ थोपटली व त्यांनीदेखील या वक्तव्याचे समर्थनच केले. त्यामुळे या दोघांविरोधातही कायदेशीर कारवाई करावी, असे महापौरांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. यावेळी सुनीता मेढे, शिवानी दाणी, संगीता शर्मा, साधना माटे, पूजा तिवारी यादेखील उपस्थित होत्या. याशिवाय भाजपातर्फे शहरातील २५ विविध पोलीस ठाण्यांमध्येदेखील तक्रार करण्यात आली.जयदीप कवाडे यांची दिलगिरीदरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत पीरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आपल्या वक्तव्यावर आज जी मंडळी टिका करीत आहेत, ती मंडळी भारताचे संविधान दिल्लीसारख्या शहरात रस्त्यावर जाळले गेले, तेव्हा कुठे होती. भाजपाच्या एका नेत्याने सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, तेव्हा त्याचा विरोध करणारे कुठे होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी नाना पटोले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मोठे कुंकू लावून सौभाग्यवतींकडून ‘मूक’निषेध : जयदीप कवाडेंना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:24 PM
महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे आमदार पुत्र जयदीप कवाडे यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्याचा निषेध करत भाजपाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर मोठे कुंकू लावून व तोंडावर पट्टी बांधून संविधान चौकात ‘मूक’निषेध केला. दुसरीकडे जयदीप कवाडे यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगासोबतच महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लकडगंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली व लगेच जामिनावर सुटकादेखील झाली.
ठळक मुद्देवादग्रस्त वक्तव्यप्रकरणी मागितली माफी