लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठे मत्स्यविक्री केंद्र असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात चोरी करून आणलेल्या माशांची विक्री होत आहे. गोसेखुर्द तसेच पेंच अभयारण्यातील तोतलाडोह जलाशयातून चोरट्या पद्धतीने मासेमारी करून जवळपास १० टन मासे शहरात आणून विकले जात आहेत.
पेंच अभयारण्य घोषित झाल्यानंतर तोतलाडोह जलाशयातील मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना या जलाशयातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मासे पकडण्यात येतात व नागपूरला आणून विक्री केले जातात. येथून जवळपास चोरीचा ५ टन माल नागपुरात येत असल्याचे विदर्भ मासेमार संघटनेचा आरोप आहे. हीच परिस्थिती गोसेखुर्द प्रकल्पाबाबतही आहे. प्रकल्पातून गेल्या काही वर्षापासून वेगवेगळया कारणाने मासेमारीचे कंत्राट काढण्यात आलेले नाही. मात्र लहानमोठे ५०० ते ६०० लाेक जलाशयातून चोरट्या मार्गाने मासेमारी करून विक्री करतात. जिल्ह्यातील कंत्राट असलेल्या ५०० च्यावर तलावातूनही अधिकृत व्यक्ती उपस्थिती नसल्यावर चोरी करून मासे पकडले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आश्चर्य म्हणजे शहरातील मासे मार्केटमध्ये हे चोरीचे मासे सर्रासपणे विकले जातात. त्यांच्याकडून जलाशयाची व मार्केटचीही पावती मागितली जात नाही. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनाही तक्रार केली आहे, मात्र कुठलीही कारवाई झाली नसल्याचे विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी सांगितले.
अधिकृत मासेमारांना नुकसान
जिल्ह्यात १२१ मत्स्यपालन संस्था असून १५ हजाराच्या जवळपास अधिकृत मासेमार सदस्य आहेत. चोरीचे मासे मार्केटमध्ये येत असल्याने अधिकृत मासेमारी करणाऱ्यांचा माशाला भाव मिळत नाही व आर्थिक नुकसान सोसावे लागते.
मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना दिले पत्र
तोतलाडोह जलाशयातील बंदी पूर्णपणे लागू करावी, चोरीने मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी किंवा हे जलाशय अधिकृत तरी करावे. गोसेखुर्द जलाशयावरही मासेमारीसाठी निविदा काढावी किंवा दोन्हीबाबत योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पुढील दोन वर्षासाठी तलाव ठेका रक्कम शासनाने माफ करावी आणि मासेमारांसाठी २०० कोटींचे पॅकेज जाहीर करावे. याबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री यांना पत्र दिले आहे.
प्रकाश लोणारे, अध्यक्ष, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ