लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी क्रांती दिनापासून सुरू झालेल्या आंदोलनाची स्वातंत्र्यदिनी सांगता झाली. यात आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला असून २६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्याचा तसेच केंद्रावर दडपण आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीजबिल माफीच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना गावबंदी करण्यासह अनेक निर्णय घेण्यात आले. (No entry to Fadanavis And Raut) (Rasta Roko for Vidarbha on 26 th Aug)
स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस होत असताना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इतवारी येथील शाहिद चौकातील ठिय्या आंदोलनात एक दिवसाचे उपोषण केले. आंदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप, राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता विदर्भातील कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग घेतला. दुपारी झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची रूपरेषा ठरली. राम नेवले यांनी ठराव मांडले. या वेळी मामर्डे यांच्यासह चेतन उमाठे, अजय कडू, राजेंद्र सताई, कपिल इत्ते, सूर्यभान शेंडे, शफिक रंगरेज, प्रियंका दिवटे यांची भाषणे व विदर्भगीते झाली.
असा असेल दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात २६ ऑगस्टला विदर्भात रास्ता रोको व जेल भरो केले जाईल. विदर्भ राज्य निर्मितीसाठी केंद्रावर दबाव आणण्याकरिता देवेंद्र फडणवीस आणि वीजबिलाच्या माफीसाठी वीजमंत्र्यांना गावबंदी केली जाईल. १ ऑक्टोबरला काटोल येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात येईल. २१ नोव्हेंबर रोजी पूर्व व पश्चिम विदर्भात जनजागृतीसाठी विदर्भ बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. नागपुरातून प्रारंभ होणार असून विविध गावांमध्ये १०० मोठ्या सभा होतील. नागपुरात या विदर्भ यात्रेचा समारोप होईल. डिसेंबर-२०२१ मध्ये संसदेवर विदर्भ मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
...