लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांना थकीत ७२ महिन्यांचा महागाई भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला होता. १८ महिन्यात हा भत्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार दर महिन्याच्या वेतनात ही रक्कम दिली जात होती. यातील काही हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र एप्रिल महिन्यात महागाई थांबविण्यात आला आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, थकीत महागाई भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी कर्मचारी व शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर महागाई भत्ता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार वर्ग -४ च्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ७०० ते ८००रुपये तर वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये मिळत होते. मागील दिवाळीपासून याला सुरुवात झाली होती. मात्र एप्रिल महिन्यात महागाई भत्ता मिळाला नसल्याची माहिती राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी दिली.
मनपा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 1:32 AM