नागपूरच्या रामेश्वरीत मोकाट सांडाचा धुमाकूळ : हल्ल्यात महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:13 PM2018-03-07T23:13:10+5:302018-03-07T23:13:23+5:30
अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक मनोज गावंडे घटनास्थळी आले. महिलेच्या डोक्याला दुखापत झाली होती. गावंडे यांनी उपचारासाठी महिलेला मदत केली. कोडवाडा विभागाला याची माहिती दिली. थोड्याचवेळात महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. पथकाने सांडाला पकडून कोंडवाड्यात टाकल्याची माहिती कोंडवाडा विभागाचे पशुचिकि त्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. याच सांडाने कुकडे ले-आऊट येथील तुलसी चहा टपरीवर पीत असलेले बसपा कार्यकर्ते चंद्रशेखर कांबळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सांडाकडे त्यांचे लक्ष असल्याने बचावले.
रामेश्वरी मार्ग, मानेवाडा,बेसा- बेलतरोडी आदी भागात मोकाट सांडांनी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. याकडे संबंधीत नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. महापालिकेने मोकाट सांडांचा बंदोबस्त करावा. अशी नागरिकांची मागणी आहे.