अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:25 PM2018-02-07T23:25:18+5:302018-02-07T23:29:03+5:30
अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह यांनी मध्यस्थी करून दुकाने सुरू केली. आंदोलनाला असोसिएशनचा पाठिंबा नव्हता, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
सुपारी कारखाना चालविणाऱ्या व्यापाऱ्यांना धमकी देऊन अवैध वसुली करण्यात एका राजकीय पक्षातील युवकांची सक्रियता वाढली आहे. मंगळवारी रात्री नेत्यांनी एका सुपारी व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पण सर्वांनी एकजुटीने विरोध केला. या घटनेची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसे पाहता व्यापाऱ्यांनी भीतीपोटी गुन्हेगारांची नावे पोलिसांना सांगितली नाही.
या घटनेचा निषेध करण्यासाठी सुपारी व्यापाऱ्यांनी आपले १२५ कारखाने बंद ठेवले. बुधवारी मस्कासाथ किराणा बाजारात निदर्शने करून घटनेचा निषेध केला. यादरम्यान सुपारी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, पण सर्वच किराणा व्यापाºयांची दुकाने सुरू होती. या घटनेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
आंदोलनात सुपारी व्यापारी अरविंद कोटेचा, विनोद कार्तिक, संजय जयस्वाल, शिवप्रताप मोरिया, श्याम मनवानी, नरेंद्र, कुमार पाहुजा, बंटी मेहता, वसीम बावला आदींनी भाग घेतला.