संघर्षाची साथ कधीच सोडली नाही
By admin | Published: April 18, 2017 01:48 AM2017-04-18T01:48:40+5:302017-04-18T01:48:40+5:30
मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती.
उमेश चौबे यांचे प्रतिपादन : शुभेच्छांच्या वर्षावात सत्कार
नागपूर : मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती. त्यामुळेच इतरत्र सरकारी नोकरी लागत असतानाही मी त्या नाकारल्या. आयुष्यभर सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. त्यातच नोकरी सोडण्याची वेळ आली. मात्र अनंत अडचणींवर मात करून मी संघषार्ची साथ कधीच सोडली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी केले. वाढदिवसानिमित्त सत्कारादरम्यान मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
नागपूरचे सजग प्रहरी आणि वरिष्ठ पत्रकार अशी ओळख असणारे उमेशबाबू चौबे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे बख्त बुलंद शाह स्मारक समिती आणि विविध संघटनांतर्फे जन्मदिवस आणि कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभचिंतकांनी केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाला उत्तर देताना ते बोलत होते. डॉक्टरांचा सल्ला डावलूनही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला, हे विशेष. पंडित उमेश शर्मा, अॅड. मधुकर किंमतकर, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, बबनराव तायवाडे, आयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मिश्रा, दीनानाथ पडोळे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित होते.
उमेशबाबू यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आलेला एक अनुभव सांगतानाच माझ्या जीवनात सिक्रेट असे काहीच नाही. ते खुली किताब आहे. प्रत्येकाने विश्वासाने दिलेला ठेवा आयुष्यात मी आजवर जपला आहे, असे प्रतिपादन शुभचिंतकांच्या शुभेच्छांना उत्तर देताना वरिष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे यांनी व्यक्त केले. मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचामुळे आजही अनेक भगिनींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
स्मारक समितीचे संयोजक राजे वीरेंद्र शाह म्हणाले, उमेशबाबूंनी अन्याय, अत्याचाराविरोधात आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या कार्याला तोड नाही. शहराचा दडपण्यात आलेला खरा इतिहास जनतेपुढे आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. आमदार, खासदारांना जे शक्य झाले नाही ते बाबूजींनी करून दाखविल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी आदिती धात्रक या मुलीने तयार केलेला केक कापण्यात आला. गिनीज बुकात सर्वात लहान उंचीची महिला म्हणून मान मिळविलेल्या ज्योती आमगे हिने बाबूजींना केक भरवला.
पंडित उमेश शर्मा यांनी उपस्थितांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन उमेशबाबूंचा सत्कार केला. तत्पूर्वी त्यांच्या वजनाची लाडूतुलाही करण्यात आली. विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिक कार्यकर्त्यांनी उमेशबाबूंना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.(प्रतिनिधी)
बाबूजींना मिळावी पद्मश्री
तत्पूर्वी कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्यांनी बाबूजींचे कार्य मोठे आहे. त्यांच्या लढाऊपणामुळे आजवर अनेकांना न्याय मिळाला. मात्र शासकीय पातळीवर आजही ते दुर्लक्षित आहेत. त्यांच्या कार्याची दखल अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. बाबूजींना पद्मश्री पुरस्कार मिळावा असे उपस्थितांना वाटते का, असा प्रश्न अचानक विचारला. उपस्थितांपैकी प्रत्येकाने हात वर करून होकारार्थी उत्तर दिले.