लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले. त्यांना जाण्यासाठी कुठलीही रेल्वेगाडी नव्हती. अखेर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि या भाविकांना त्यांच्या गावाकडे रवाना केले.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील निवासी चंद्रदत्त त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूणू ८० प्रवासी दहा दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला निघाले होते. जगन्नाथपुरी, श्रीशैलम, तिरुपती आदी तीर्थक्षेत्रांच्या दर्शनानंतर दोन दिवसांनी ते रामेश्वरमला पोहोचले. येथून त्यांना अलाहबादला जायचे होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यांच्याजवळ आरक्षणाची रेल्वे तिकिटे होती. मात्र, गाडी मिळत नसल्याने त्यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मिळेल त्या गाडीने ते अलाहबादकरिता निघाले. दरम्यान, ही गाडी अलाहबादला नव्हे तर दिल्लीला जात असल्याचे समजताच ते सर्व भाविक रविवारी नागपुरात उतरले. सकाळी आलेल्या एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. परंतु ८० पैकी ५२ प्रवाशांनाच गाडीत जागा मिळाली. उर्वरित २८ प्रवाशांना नागपुरातच थांबावे लागले. यावेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांची ताटातूट झाली. नागपुरात थांबलेल्या २८ प्रवाशांनी संपूर्ण रात्र स्टेशनवरच काढली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिक होते. या भाविकांची रेल्वे प्रशासनाने आणि प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. दुपारी २ नंतर रेल्वे प्रशासनाने खासगी वाहतूक एजन्सीसोबत बोलणे करून या भाविकांसाठी खासगी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर हे भाविक आपापल्या गावाकडे रवाना झाल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी सांगितले.
नागपूर रेल्वेस्थानकावर अडकले २८ भाविक : गर्दीमुळे चढू शकले नाही गाडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 8:29 PM
रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले.
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने केली जाण्याची व्यवस्था