मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:06 AM2019-12-25T03:06:34+5:302019-12-25T03:07:04+5:30
१५० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मेसचे कंत्राट आनंद टेंभूर्णे यांना देण्यात आले आहे
नागपूर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या निघणे, निकृष्ट दर्जाचे जेवण, महिनोमहिने केळी किंवा एखाद्यावेळी दुसरे फळ मिळाल्यास ते सुद्धा किडीचे आदी तक्रारींची दखल घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, येथील विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून उपाशी राहून आंदोलन सुरू केले आहे.
१५० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या मेसचे कंत्राट आनंद टेंभूर्णे यांना देण्यात आले आहे. सकाळचा नाश्त्यासह दोन वेळच्या भोजनाची जबाबदारी या कंत्राटदाराकडे आहे. एका विद्यार्थ्यांकडून कंत्राटदाराला महिन्याकाठी ४८५० रुपये दिले जातात. परंतु जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. १५० विद्यार्थी असताना केवळ ४० अंडी दिली जातात. १२ लिटर दूध आणले जाते. ते पुरविण्यासाठी त्यात पाणी ओतले जाते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.