विद्यार्थ्यांना ‘लालपरी’ची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:03+5:302021-02-07T04:09:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटोल : काेराेनामुळे १० महिन्यानंतर शाळांची घंटा वाजली. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, नियमित ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटोल : काेराेनामुळे १० महिन्यानंतर शाळांची घंटा वाजली. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, नियमित वर्गही भरत आहेत. परंतु खेड्यापाड्यातील एसटीच्या बसफेऱ्या अद्यापही बंदच असल्याने, ग्रामीण भागातील शेकडाे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. शाळेच्या वेळेत एकही बसफेरी नसल्याने विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेत ये-जा करतात. परंतु ही खासगी वाहतूक विद्यार्थ्यांसाठी डाेकेदुखी ठरत असून, त्यांना गैरसाेईचा सामना करावा लागत आहे.
काेराेना संसर्गामुळे मार्च २०२० पासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद हाेती. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तब्बल १० महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या. परंतु काटाेल आगारातून धावणाऱ्या खेड्यापाड्यातील बसफेऱ्या अजूनही बंद आहेत. काटाेल ते मेटपांजरा, मगरसूर ही नियमित बसफेरी बंद असल्याने परिसरातील डोरली, सोनखांब, चारगाव, मेंढेपठार (बाजार), चिखली (माळोदे), मरगसूर, वाजबोडी आदी गावातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी गैरसाेय हाेत आहे. बसफेरी सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे, असा पेच निर्माण झाला आहे. बसफेरीअभावी शेकडाे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. बसफेऱ्या बंद असल्याने अधिक भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागताे. यात शाळेत पाेहाेचण्यास उशीर हाेत असून, शाळा सुटल्यानंतर वाहनासाठी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ही खासगी वाहतूक विद्यार्थ्यांसाठी डाेकेदुखी ठरत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, मेंढेपठार (बाजार), कोंडासावळी, वाई, चिखली (माळोदे), मरगसूर, वाजबोडी, मेटपांजरा, डोरली, चारगाव सोनखांब, हातला, लिंगा, कुकडी पांजरा या मार्गावरील बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.