विद्यार्थ्यांनी दिली रात्री परीक्षा
By admin | Published: February 28, 2017 02:08 AM2017-02-28T02:08:18+5:302017-02-28T02:08:18+5:30
रामटेक तालुक्यातील वाहिटोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) एकूण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेतात.
रामटेकच्या ‘आयटीआय’मधील प्रकार : प्राचार्याच्या मनमानीमुळे विद्यार्थी-शिक्षक त्रस्त
मनसर : रामटेक तालुक्यातील वाहिटोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) एकूण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेतात. मात्र, या विद्यार्थी तसेच शिक्षक प्राचार्य बन्सोड यांच्या मनमानी कारभाराला चांगलेच त्रासले आहेत. याचा कळस म्हणजे, प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी परीक्षा द्यायला भाग पाडले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
रामटेक नजीकच्या वाहिटोला येथे आयटीआयच्या दोन प्रशस्त इमारती आहेत. यातील एका इमारतीमध्ये वर्ग खोल्या, शिक्षकांची खोली, प्राचार्यांचे कार्यालय व इतर कार्यालये असून, दुसऱ्या इमारतीमध्ये सर्व विभागांचे प्रात्यक्षिक कक्ष आहेत. या संस्थेत विद्यार्थ्यांना वीजतंत्री, तारतंत्री, डिझल मेकॅनिक, वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, गवंडी यासह विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. या संस्थेत कन्हान, पारशिवनी, देवलापार, करवाही, अरोली, कोदामेंढी यासह अन्य गावांमधील एकूण २५० विद्यार्थी शिक्षण घेतात.
प्राचार्य बन्सोड मनमानी करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ते दमदाटी करीत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तक्रारी केल्यास वाईट परिणाम होणार असल्याच्या धमक्याही देत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्राचार्य बन्सोड यांनी २१ जानेवारी रोजी वर्कशॉपच्या दारात उभे राहून अनेक विद्यार्थ्यांना घरी पाठविले. ‘एनएसएस’च्या कार्यक्रमात त्यांनी गट निदेशक शिक्षिका व इतर शिक्षकांना अपमानित केले. एवढेच नव्हे तर तक्रार केल्यास परिणाम भोगण्याची धमकीही दिली. त्यांचे असले प्रकार वाढीस लागल्याने विद्यार्थ्यांनी फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या परीक्षेत विद्यार्थ्यांना अपुरे पेपर देणे, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करणे, कुणाला इंग्रजी तर कुणाला न समजणाऱ्या हिंदी भाषेतील प्रश्नपत्रिका देणे, ऐनवेळी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती वितरित करणे, विद्यार्थ्यांना रात्रीच्यावेळी परीक्षा द्यायला भाग पाडणे अशा अनुभवाला सामोरे जावे लागले. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु, कुणीही गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांनी आ. डी. एम. रेड्डी, तहसीलदार रवीेंद्र माने, सहसंचालक (व्यवसाय शिक्षण कार्यालय नागपूर) रणजित देशमुख तसेच कौशल्य विकास आणि उद्योजगता विभागाकडे लेखी तक्रारी दिल्या. मात्र, कुणीही तक्रारीची दखल घेण्याचे औदार्य दाखविले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढा
प्रशिक्षण सुरू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत ‘ईडी’ व ‘ईएस’ या विषयांचे शिक्षक नव्हते. दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली नाही. शौचालयांची साफसाफाई केली जात नाही. कार्यशाळेत उघड्या विजेच्या तारांमुळे जीवित हानी होण्याची शक्यता बळावली आहे. येथील वीजपुरवठा नेहमीच कमी-अधिक होतो. प्रात्यक्षिक करण्यासाठी योग्य उपकरण नाही. प्राचार्य नेहमी गैरहजर असतात. ग्रंथालय अद्यापही सुरू करण्यात आले नाही. भांडार विभाग बंद असल्याने आवश्यक उपकरण मिळत नाही. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी विद्यर्थ्यांवर दबाव टाकला जातो. अशा अनेक समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांनी वाचला.