इंग्रजीचा पेपर लिहून लिहून विद्यार्थी दमले; साेपा वाटला पण कठीण झाला
By निशांत वानखेडे | Published: February 21, 2024 05:15 PM2024-02-21T17:15:24+5:302024-02-21T17:16:16+5:30
बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला.
निशांत वानखेडे, नागपूर : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. टेंशन घेऊनच परीक्षा हॉलमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांवर पेपर संपवून बाहेर पडताना काहीसे दडपण आल्याचे जाणवले. पेपर सोपा होता पण खुपच वर्णनात्मक होता. लिहून लिहून हात दुखले, दमायला आले पण पूर्ण प्रश्न सोडवायला दमछाक झाल्याची प्रतिक्रिया मुलांनी हॉलमधून बाहेर पडताना दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देत असून शहरातील ३९,८३४ आणि ग्रामीण भागातील २६,२७९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात ८५ आणि ग्रामीण भागात ८३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. इंग्रजीचा पेपर असला की विद्यार्थ्यांवर दडपण असते. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा विषय फारसा कठीण वाटत नाही पण कला व वाणिज्य शाेखतील विद्यार्थ्यांसाठी टेंशन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. ज्यांची लिहिण्याची गती चांगली, त्यांच्या साठी समाधानकारक तर लेखनगती कमी असलेल्यांची मात्र दमछाक झाली.
खुपच वर्णनात्मक, लिहून हात दुखले :
पेपर खुप ‘लेंदी’ असल्याचे मुलांचे म्हणणे हाेते. प्रश्नपत्रिकेतील निबंध असलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर साेडविताना खुप वेळ लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शेवटचा ‘नाॅव्हेल’वरील प्रश्नही दमायला लावणारा हाेता. उत्तर साेपे हाेते पण लिहावे खुप लागल्याचे मुलांनी सांगितले. लिहून लिहून हात दुखले पण पेपर काही पूर्ण झाला नाही, असेही काहींनी सांगितले.
वेळेचे नियोजन गडबडले :
खुप वर्णनात्मक असल्याने वेळेचे नियाेजन गडबडल्याचे काहींनी सांगितले. काेणता प्रश्न आधी साेडवायचा याचा विचार करून साेडविणे आवश्यक होते. काही प्रश्न सोडवायला खुप चेळ लागल्याने पूर्ण पेपर साेडविता आला नाही, असे काहींचे म्हणणे हाेते, तर काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात घाईघाईत पेपर पूर्ण केल्याचे सांगितले. लिहिण्याची गती चांगली असलेल्यांनी मात्र पेपर खुप चांगला गेल्याचे सांगितले.
मिळालेले १० मिनिटेही कमी पडले :
यावेळी पेपर संपल्यानंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात आले हाेते. मात्र हा वेळही कमी पडल्याची भावना काहींनी व्यक्त केली. पेपर साेपा असला तरी लिहायला कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे हाेते.