मोर्चेकऱ्यांमुळे विद्यार्थी, रुग्णांची कुचंबणा
By admin | Published: December 10, 2015 03:02 AM2015-12-10T03:02:31+5:302015-12-10T03:02:31+5:30
बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे आणि वाहतूक पोलीस योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले : अनेक ठिकाणी जाम
नागपूर : बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे आणि वाहतूक पोलीस योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे सर्वात जास्त कुचंबणा विद्यार्थी आणि रुग्णांची होत आहे.
विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे विधिमंडळावर पहिल्याच दिवशीपासून मोर्चे धडकत आहेत. पहिल्या दिवशी आदिवासींचा भव्य मोर्चा विधिमंडळावर धडकला. पहिल्याच मोर्चाने धंतोली, सीताबर्डी, मुंजे चौक, महाराजबाग, विद्यापीठ परिसर आणि सदरमध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला. सीताबर्डीत तर पोलीस ठाण्यासमोरच गोंधळ उडाला. जागोजागी वाहनांची गर्दी झाली. त्यामुळे नागपूरच नव्हे तर बाहेरून आलेल्यांचीही कुचंबणा झाली.
अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक आणि वाहने आल्यामुळे तसेच पहिला दिवस असल्यामुळे अंदाज चुकला असावा, असे मानून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही अशीच स्थिती होती. काँग्र्रेसच्या दणकेबाज मोर्चामुळे उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेची पुरती दाणादाण उडाली. रहाटे कॉलनी, दीक्षाभूमी परिसर, लक्ष्मीभवन चौक, सदर, सिव्हिल लाईन, धंतोली, मुंजे चौक, रेल्वेस्थानक मार्ग, कस्तूरचंद पार्क, विद्यापीठ परिसर, आकाशवाणी चौक, महाराजबाग, धरमपेठसह अनेक भागात ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा उडाला.
फर्लांगभर अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा-पाऊण तासाचा वेळ लागत होता. वाहनांचा खोळंबा झाला, त्यात अनेक ठिकाणी रुग्णवाहिका, स्कूल व्हॅन होत्या. धूर, कर्णकर्कश भोंगे यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, छोटे छोटे विद्यार्थी यांची मोठी कुचंबणा झाली. (प्रतिनिधी)