खनिज उद्योगांचे क्लस्टर उभारणार : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 08:24 PM2019-02-09T20:24:04+5:302019-02-09T20:26:15+5:30
राज्यात खनिज उद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून, खनिजसंपदा असलेल्या ठिकाणी आधारित प्रक्रिया व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात खनिज उद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून, खनिजसंपदा असलेल्या ठिकाणी आधारित प्रक्रिया व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
उद्योग आणि खनिकर्म विभाग (एमएसएमसी), विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममूर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालीवाल, राहुल उपगन्लावार उपस्थित होते.
यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समूहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. महासँड आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुभाष देसाई म्हणाले, विदर्भात खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी असून, परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधीसंदर्भात विचारमंथन होईल. महत्त्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसुलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. उद्योगांना वीजदरात आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे.
बंद कोळसा खाणी सुरू करण्यावर भर : नितीन गडकरी
गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरू करून, तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरू करण्यात येणार आहेत. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधननिर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे हब म्हणून विकसित होऊ शकते.
खनिज उद्योगांना स्वस्त वीज : चंद्रशेखर बावनकुळे
सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतिकारक बदल होत आहे. फ्लाय अॅशसंदर्भात स्वतंत्र धोरण असून, फ्लाय अॅश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्स्प्रेस फीडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करून देण्यात येईल.
आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धित उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण आहे.
याप्रसंगी सतीश गवई व देवेंद्र पारेख यांनी अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे असल्याचे सांगितले. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेचे आहे. संचालन रिना सिन्हा व अतुल ताजपुरिया यांनी तर शिवकुमार राव यांनी आभार मानले.