नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारविरुद्ध कुठलीही टिप्पणी केली नाही. त्यामुळे सरकारला नपुंसक म्हटले, असा कांगावा करून राजकारण करणारे अज्ञानी असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले नाही. राज्य सरकारने काय-काय कारवाई केली, हे सांगितल्यानंतर राज्य सरकारविरुद्ध अवमानना नोटीस किंवा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही. याउलट इतर राज्यातही कोणकोणती वक्तव्ये केली जात आहेत आणि कसे महाराष्ट्राला पिनपॉइंट करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सॉलिसिटर जनरल यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वसाधारण वक्तव्य केले की, सर्व राज्यांनीच कार्यवाही केली पाहिजे. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही, त्यांना उत्तर देण्याची काही एक गरज नाही, असेही फडणवीस म्हणाले.
संभाजीनगरातील घटनेवरून राजकारण कशासाठी ?
छत्रपती संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. कुणीही राजकारण करू नये. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु काही नेते भडकावू वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांनी चुकीचे वक्तव्य देऊन परिस्थिती आणखी खराब करू नये. आपली शहरं शांत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.