लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भुटान येथील विश्वसाहित्य, शांतता आणि मानवाधिकार मंचाने कवी सुधाकर गायधनी यांना ‘आंतरराष्ट्रीय शांतीदूत’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. आपल्या साहित्यातून जागतिक मानवाधिकार आणि शांततेची मांडणी करणाऱ्या साहित्यिकाला शांतिदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या संस्थेचे भुटान येथील डॉ. बिस्वा हे संस्थापक आहेत. पुरस्कार निवड समितीच्या आंतरराष्ट्रीय सदस्य रोमानियन कवयित्री लेनूस यांनी गायधनीच्या नावाची शिफारस केली होती. गायधनी यांचे ‘देवदूत’ हे महाकाव्य रोमानियन भाषेत प्रकाशित झाले आहे. डॉ. ओम बियाणी यांनी या काव्याचे ‘अभिजात महाकाव्य’ या शिर्षकाने केलेल्या इंग्रजी समीक्षणाची इंग्लंडच्या ‘दी पोयट’ या वेब मासिकाने आंतरराष्ट्रीय प्रसारणासाठी निवड केली आहे.