शुगर सोबतच वजनही कमी करणारी औषधे : सुनील गुप्ता यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:07 PM2019-08-16T23:07:48+5:302019-08-16T23:09:16+5:30
पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मधुमेहाच्या रुग्णांसाठी नवे संशोधन व उपचार प्रणाली वरदान ठरणारी आहे. विशेष म्हणजे, ‘ग्लिफ्लोझीन’या औषधांच्या ग्रुपमुळे शरीरात वाढलेली साखर लघवीतून बाहेर टाकणे आता शक्य झाले आहे. तसेच पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.
‘सुनील डायबिटीज केअर अॅण्ड रिसर्च सेंटर’ व ‘डायबिटीज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिल्व्हर ज्युबली’ वर्षाच्या निमित्ताने १८ ऑगस्ट रोजी सायंटिफिक सभागृहात सकाळी ८.३० वाजतापासून ‘हॅलो डायबिटीज’ शैक्षणिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजय अंबाडे, डॉ. मोहित झामड, डॉ. कविता गुप्ता व डॉ. सरिता उगेमुगे उपस्थित होत्या.
डॉ. गुप्ता म्हणाले, भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तरुणांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे येत्या दहा वर्षात पुढे येणारे चित्र धक्कादायक असू शकेल. यातून मार्ग काढण्यासाठी या आजाराची जनजागृती आवश्यक आहे. गेल्या २५ वर्षांतून ‘हॅलो टायबिटीज’मधून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व रुग्णांना या विषयी माहिती देऊन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
औषधे गाठणार शंभरी
डॉ. गुप्ता म्हणाले, मधुमेहावरील औषधांना येत्या २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहे. या रोगावरील औषधांमध्ये नित्य बदल होत गेले आहे. परंतु नुकतेच आलेल्या ‘इम्पा ग्लिफ्लोझीन’, ‘डापा ग्लिफ्लोझीन’, ‘कामा ग्लिफ्लोझीन’ औषधे रुग्णांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या उपलब्ध गोळ्या शरीरातील इन्सुलिनवर नियंत्रण मिळवितात. परंतु या औषधांमुळे शरीरात वाढलेली साखर थेट लघवीवाटे बाहेर पडते. यामुळे मूत्रपिंड, हृदय, ‘हार्ट फेल्युअर’चा धोका कमी होतो.
हृदय, मूत्रपिंडाला मिळते संरक्षण
‘गल्प-१ अॅनालॉम’ या लसीमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, सोबतच वजन कमी होण्यास मदतही करते. या लसीमुळे हृदय, मूत्रपिंडाला संरक्षण मिळते. ‘हार्ट फेल्युअर’ धोका कमी होतो व रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासही मदत करते, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.