सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) ६०० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने याचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रियेच्या रुग्णांना बसला आहे. एकाच शस्त्रक्रियागृहात ईएनटी, जनरल सर्जरी, नेत्र व ऑर्थाेपेडिक विभागाच्या शस्त्रक्रिया होत असल्याने मर्यादित शस्त्रक्रिया होत आहेत. तातडीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. सामान्यांनी जावे कुठे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमधील रुग्णांच्या सोयीसाठी सुमारे ५४ कोटी रुपये खर्चून ५५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. या कॉम्प्लेक्समध्ये शल्यचिकित्सा (सर्जरी) विभाग, अस्थिव्यंगोपचार (ऑर्थाेपेडिक) विभाग, कान, नाक व घसा (ईएनटी) विभाग आणि नेत्ररोग विभागाच्या प्रत्येकी तीन-तीन शस्त्रक्रियागृह, रिकव्हरी वॉर्ड व सामान्य वॉर्ड आहे. यात प्रत्येक विभागाच्या एका शस्त्रक्रियागृहाला ‘मॉड्युलर ओटी’चे स्वरूप देण्यात आले. याचा फायदा रुग्णांना होऊ लागला होता. परंतु मे महिन्यात सर्जिकल कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले. यामुळे हे विभाग दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. या चारही विभागांच्या शस्त्रक्रियेसाठी आता एकच शस्त्रक्रियागृह उपलब्ध आहे.
रुग्ण मेडिकलला रेफरलॉकडाऊनच्या काळात मेयोची अडीच हजाराची रोजची ओपीडी ५०० वर आली होती. अनलॉक होताच हीच ओपीडी पुन्हा आता हजारावर गेली आहे. इतर आजारांची रुग्णसंख्या वाढत असताना सोयीच उपलब्ध नसल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेषत: ईएनटी, सर्जरी, आर्थाे व नेत्र विभागासाठी एकच शस्त्रक्रियागृह असल्याने मोजक्याच शस्त्रक्रिया होत आहेत. पूर्वी २० ते ३० मेजर सर्जरी तर ३५ ते ४० मायनर सर्जरी व्हायच्या. आता एक ते दोन मेजर सर्जरी तर पाच ते १० मायनर सर्जरी होत असल्याची माहिती आहे. महत्त्वाच्या व तातडीच्या शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मेडिकलकडे रेफर केले जात आहे. यात सामान्य व गरीब रुग्ण अडचणीत आले आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजना सुरू व्हावीशहरात २० वर मोठी खासगी हॉस्पिटल आहेत. प्रत्येकांच्या खाटांची संख्या १०० वर आहे. या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केल्यास लाभार्थ्यांना उपचार मिळतील. मेयो, मेडिकलवर वाढलेला रुग्णांचा भार काही प्रमाणात कमी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.