नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर-एका तरुणाला बेदम मारहाण केल्याच्या तसेच काळा बाजारीच्या धान्याची गाडी पोलीस ठाण्यात लावून कारवाईचा धाक दाखवत लाखोंची तोडी केल्याच्या आरोपावरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनिष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चाैघांना निलंबित करण्यात आले. या घडामोडीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पीएसआय दराडे हे यशोधरा नगर पोलीस ठाण्यात डीबी इन्चार्ज (गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख) आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत अवैध धंदे करणारे आणि गुन्हेगार मोकाट सुटल्यासारखे वागत आहेत. पोलिसांचे त्यांच्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचाही आरोप होत आहे. खाबुगिरी आणि वसुलीच्याही मोठ्या तक्रारी आहेत. २७ - २८ मे रोजी एका काळा बाजारी करणाऱ्या धान्याचे वाहन पोलिसांनी पकडले आणि कारवाईचा धाक दाखवून मोठी वसुली केल्याची जोरदार चर्चा होती. ती ओरड शांत झाली नसतानाच एका उच्चशिक्षित तरुणाला बेदम मारहाण केल्याची तक्रार झाली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे हे प्रकरण गेले. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत चाैकशीचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सोमवारी त्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांना सादर केला. त्यात पीएसआय दराडे, हवालदार भोसले, शिपाई पाल आणि जांभूळकर या चाैघांना दोषी धरल्यामुळे आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याची सूचना वरिष्ठांना केली. या पार्श्वभूमीवर, उपरोक्त चाैघांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्यात भूकंप आल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या संबंधाने ठाणेदार अशोक मेश्राम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निलंबनाच्या कारवाईला दुजोरा दिला; मात्र सुटीवर असल्याने सविस्तर माहिती नसल्याचे ते म्हणाले. तर, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सानप यांना वारंवार मोबाइलवर संपर्क करूनही त्यांनी माहिती देण्याचे टाळण्यासाठी फोनच उचलला नाही.
चटावल्यामुळेच कारवाई
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी अवैध धंद्यांमुळे वाढते. त्यामुळे तुमच्या ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करून खाबुगिरी करू नका, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्तांनी प्रत्येक ठाणेदाराला दिले आहे. दोषी आढळल्यास कडक कारवाईची तंबीही दिली आहे; मात्र अनेक जण आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांना समोर करून स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्त आहे. त्यातूनच कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी चांगलेच सोकावले आहेत. ते मनमानी कारभार करत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
---